वकील लाचलुचपतच्या जाळ्यात,१ लाख ७० हजाराची लाच स्वीकारताना अटक
इचलकरंजी –
थकीत कर्जापोटी बँकेकडून घरावर होणारी जप्तीची कारवाई पुढे ढकलण्यासाठी तक्रारदाराकडून १ लाख ७० हजार रुपयांची लाच स्विकारताना कोल्हापूर येथील इंडियन बँक शाखेतील पॅनलमधील कायदेशीर सल्लागार अॅड. विजय तुकाराम पाटणकर यांना सीबीआय लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी रात्री अटक केली. दरम्यान, संशयित अॅड. पाटणकर यास न्यायालयात हजर केले असता एकदिवसांची पोलिस कोठडी सुनावली.
याबाबत मिळालेली माहिती अशी, तक्रारदाराने इंडियन बँक कोल्हापूर शाखेतून साडेपाच कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते. सदरचे कर्ज थकबाकीत गेल्याने बँकेने जप्तीच्या कारवाईबाबत नोटीस पाठविली होती. मात्र तक्रारदाराने आपल्या घरी शुभकार्य असल्याने सदर जप्तीची कारवाई पुढे ढकलण्यात यावी, अशी विनंती कायदेशीर सल्लागार अॅड. पाटणकर यांच्याकडे केली होती. त्यावर पाटणकर यांनी कारवाई पुढे ढकलण्यासाठी अडीच लाख रुपये लाचेची मागणी केली. तडजोडीअंती १ लाख ७० हजार रुपये देण्याचे ठरले. त्यानंतर तक्रारदाराने या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. परंतु राष्ट्रीयकृत बँकेच्या पॅनेलवरील वकिलाविरुध्द तक्रार असल्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पुण्यातील सीबीआय कार्यालयास माहिती कळविली होती. त्यानंतर तक्रारची पडताळणी करुन तातडीने सापळा रचण्यात आला. मंगळवारी रात्री अॅड. पाटणकर याच्या भारत दूरसंचार निगम कार्यालय परिसरातील ऑफिसमध्ये १ लाख ७० हजाराची लाच स्विकारताना अॅड. पाटणकर याला रंगेहात पकडण्यात आले. आज न्यायालयात हजर केले असता एकदिवसाची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800