रेबीज लसी बाबत आ.राहुल आवाडेंकडून आयजीएम प्रशासन धारेवर
इचलकरंजी –
येथील इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात रेबीज लस उपलब्ध असतानाही रुग्णास सांगली अथवा कोल्हापूर येथे जाण्यास सांगण्याच्या प्रकाराची आमदार डॉ. राहुल आवाडे यांनी तात्काळ गांभीर्याने दाखल घेत नाराजी व्यक्त करत संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यावर कारवाईची मागणी केली. त्यानुसार रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिक्षक डॉ. भाग्यरेखा पाटील यांनी संबंधितास बेजबाबदार वर्तणुकीबद्दल कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
काल (शनिवारी) सायंकाळी वर्धमान चौक परिसरातील दोन नागरिक पिसाळलेले कुत्रे चावल्याने इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात उपचारासाठी आले होते. त्याच्यावर उपचार करत एक इंजेक्शन दिले. परंतु कोणतीही खातरजमा न करता अथवा माहिती न घेता रेबीजचे आवश्यक इंजेक्शन उपलब्ध नसल्याचे सांगत रुग्णाना सांगली अथवा कोल्हापूर येथे जाण्यासाठी रेफर केले. तर काही वेळानंतर इंजेक्शन असल्याचे सांगण्यात आले. या संपूर्ण गोंधळ संदर्भातील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्याची तात्काळ दखल घेत आमदार डॉ. राहुल आवाडे यांनी थेट दूरध्वनीवरून वैद्यकीय अधिक्षक डॉ. भाग्यरेखा पाटील यांच्याशी संपर्क साधत झाल्या प्रकारची माहिती घेतली.
आमदार आवाडे यांनी, इंदिरा गांधी सामान्य रुग्णालय हे इचलकरंजीसह हातकणंगले व शिरोळ तालुका व नजीकच्या सीमावर्ती भागातील नागरिकांसाठी आधारवड आहे. आवश्यक त्या सुविधा उपलब्ध होत आहेत. रेबीजचे इंजेक्शन उपलब्ध असताना ते न देण्यामागचे कारण काय? असा सवाल करत अशामुळे रुग्णालयाची प्रतिमा मलीन होत असल्याबद्दल नाराजी व्यक्त करत संबंधितावर कारवाई करण्याची मागणी केली.
त्याची दाखल घेत डॉ. पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यास कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. आमदार डॉ. राहुल आवाडे यांनी दाखविलेल्या तत्परतेबद्दल नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे.
सामाजिक कार्यकर्ते सॅम आठवले यांच्याकडून प्रकरण उघडकीस.
इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात सदर घडलेला प्रकार सामाजिक कार्यकर्ते सॅम आठवले यांनी उघडकीस आणला व सोशल मिडियावर व्हायरल केला.त्यानंतर आ.राहुल आवाडेंनी याप्रकरणी दखल घेत प्रशासनाची कान उघडणी केली.

Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800