आमदार राहुल आवाडे यांची महापालिकेत इंट्री कधी?महापालिकेची भूमिका गुलदस्त्यात
इचलकरंजी
इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातून आमदार राहुल आवाडे हे २३ नोव्हेंबर २०२४ रोजी ५६,८११ इतक्या मताधिक्याने निवडून आले.त्यानंतर अधिवेशन काळात त्यांनी इचलकरंजी शहराचे प्रलंबित प्रश्न मांडून अल्पावधीत आपल्या कामाची चुणूक दाखवून दिली. अधिवेशन संपल्यानंतर इचलकरंजी शहरांमध्ये पुरवठा कार्यालय, आयजीएम रुग्णालय यासारख्या ठिकाणी नागरिकांच्या तक्रारी सोडवण्यासाठी स्वतः जाऊन झाडाझडती घेतली व कडक शब्दात सुचना दिल्या.इचलकरंजी महानगरपालिका जवळपास ७०० कोटी रुपयांचे बजेट असणारी महाराष्ट्रातील महापालिका असून इचलकरंजी शहराच्या नागरी सुविधा व बरेच प्रश्न इचलकरंजी महापालिकेशी निगडित असतात. नागरिकांच्या लहान मोठ्या समस्यासह मोठ्या प्रमाणात कामे इचलकरंजी महानगरपालिकेअंतर्गत होत असतात.महापालिका प्रशासनाच्या कामकाजाबाबत नागरिकांच्या वारंवार तक्रारी येत असून माजी आ.प्रकाश आवाडे यांनी ५ वर्षांपूर्वी मंजूर करून आणलेले ९९ पेयजल प्रकल्प अद्यापही पूर्ण क्षमतेने सुरू नाहीत.
त्याचबरोबर इचलकरंजी शहरांमध्ये आता हिवाळ्यातही सुमारे चार-पाच-सहा दिवसा आड पाणी येत असून पाणीपुरवठयाचे नियोजन ही पूर्णपणे कोलमडलेले आहे,कचरा उठावाची समस्या काही ठिकाणी सातत्याने उदभवत आहे.इचलकरंजी शहरातील नागरिकांना आपल्या किरकोळ कामांसाठी महानगरपालिकेत हेलपाटे मारावे लागतात.लोकप्रतिनिधी या नात्याने आ.राहुल आवाडे यांनी महापालिकेला शासनाकडून आवश्यक सोयीसुविधा याबाबत आढावा घेणे आवश्यक आहे.इचलकरंजी शहरातील बऱ्याच समस्या या महापालिकेशी निगडित आहेत.निवडून आल्यानंतर लोकप्रतिनिधी प्रथम स्थानिक स्वराज्य संस्थेत भेट देऊन आढावा घेत असतात मात्र आ. राहुल आवाडे ४० दिवसानंतर सुद्धा महानगरपालिकेत आले नाहीत, माजी आमदार प्रकाश आवाडे आणि आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांच्यातील वादाची पार्श्वभूमी या मागे आहे का?मर्जीतील आयुक्त आणल्यावरच आ.राहुल आवाडेंची महापालिकेत इन्ट्री होणार का याबाबत नागरिकांत उलट सुलट चर्चा सुरू आहे.
महापालिका प्रशासनाने आ.आवाडेंशी संवाद साधणे आवश्यक.
महापालिका प्रशासनाची बहुतांशी कामे ही शासनाकडून होत असली तरी यामध्ये आमदारांची भूमिका महत्वाची असते.आमदार आणि महापालिका यांनी समन्वयातून एकत्रित काम करून शहरासाठी विविध योजना राबवणे गरजेचे असते.त्यामुळे महापालिका प्रशासनाने लोकप्रतिनिधी यांच्याशी संवाद साधावा व शहराच्या विकासात राजकारण व मतभेद आड आणू नयेत अशी मागणी नागरिक करत आहेत.

Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800