भाई नेरुरकर चषक खो खो स्पर्धेच्या निधीत २५ लाखाची वाढ-आ.राहुल आवाडे.
इचलकरंजी –
कै. भाई नेरूरकर चषक खो-खो स्पर्धेसाठी शासनाकडून दिल्या जाणाऱ्या निधीत वाढ करण्यात आली असून आता स्पर्धेसाठी ७५ लाखांच्या ऐवजी १ कोटी रुपये देण्याची घोषणा शासनाने केली आहे. या संदर्भात आमदार राहुल आवाडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा केला होता. त्याला यश आल्याची माहिती आ.राहुल आवाडे यांनी दिली.
भारतीय खो-खो महासंघाशी संलग्न असलेली व राज्याचा दर्जा असलेली कै. भाई नेरूरकर चषक खो- खो स्पर्धा सन २०२४-२५ साठी इचलकरंजी येथे घेणेचे निश्चित झाले आहे. स्पर्धेच्या आयोजनासाठी मोठा खर्च येतो. शासनाकडून या स्पर्धेसाठी निव्वळ ७५ लाख रुपये इतकाच निधी दिला जात होता. हा निधी अत्यंत तोकडा पडतो व त्यामुळे स्पर्धेच्या आयोजनात अनेक अडचणी येतात. ही स्पर्धा राज्य दर्जाची असलेने भव्य-दिव्य होणे अपेक्षित असल्याने शासनाकडून मिळणारा निधी २ कोटी इतका मिळावा अशी मागणी आमदार राहुल आवाडे यांनी केली होती.
त्याला अनुसरून महाराष्ट्र शासनाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाज चषक कबड्डी, खाशाबा जाधव कुस्ती, भाई नेरुरकर चषक खो-खो आणि छत्रपती शिवाजी महाराज चषक व्हॉलीबॉल अशा चारही स्पर्धांना आता १ कोटी रुपयाचे अनुदान दिले जाईल अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी केली आहे. आतापर्यंत या चारही स्पर्धांना सरकारकडून ७५ लाख रुपयाचे अनुदान मिळत होते. त्यामध्ये वाढ करण्यात आल्याने खेळाडूमध्ये समाधान व्यक्त होत आहे.

Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800