डीकेएएससी मध्ये श्री स्वामी विवेकानंद जयंती सप्ताहाची सांगता.
इचलकरंजी :
येथील दत्ताजीराव कदम आर्ट्स, सायन्स अँड कॉमर्स कॉलेज येथे श्री स्वामी विवेकानंद जयंती सप्ताहाचा सांगता समारंभ व शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे स्पर्धेच्या शाखास्तरीय स्पर्धांचा पारितोषिक वितरण समारंभ प्रमुख पाहुणे आ.रा.पाटील कन्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बाबासाहेब दुधाळे यांच्या उपस्थितीत व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. एम. मणेर यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी सप्ताहात घेण्यात आलेल्या विविध गटातील वक्तृत्व, निबंध, चित्रकला, कराओके व सुगम गायन स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थी व गुरुदेव कार्यकर्त्यांना प्रमुख पाहुणे प्राचार्य डॉ.बाबासाहेब दूधाळे व मा. प्राचार्य डॉ. एस. एम. मणेर यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
यावेळी बोलताना प्रमुख पाहुणे प्राचार्य डॉ. बाबासाहेब दूधाळे म्हणाले, ” पारंपरिक शिक्षणाबरोबर विद्यार्थ्यांच्या अंगी असणाऱ्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा यासाठी श्री स्वामी विवेकानंद जयंती सप्ताह या विविध स्पर्धा संपन्न होत असतात. विवेकानंदांचे विचार आणि त्यांचे जगणे दीपस्तंभासारखे आपल्यासमोर उभे आहे. शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे, संस्थामाता सुशीलादेवी साळुंखे यांनी खूप मोठा त्याग करून आपल्या सर्वांसाठी ही ज्ञानाची कवाडे खुली केली आहेत. याप्रती आपण कायम कृतज्ञ असायला हवे. वाचनसंस्कृती चळवळ टिकवून ठेवण्यासाठी सोशल मीडियातून बाहेर पडून विद्यार्थ्यांनी पुन्हा पुस्तकांमध्ये रमायला हवे “
अध्यक्षीय मनोगतात बोलताना प्राचार्य डॉ. मणेर म्हणाले की, शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांनी स्वामी विवेकानंद जयंती सप्ताह सुरू केला तो सत्य, शील, प्रामाणिकता, त्याग आणि पिळवणूकीस आळा या पंचशील तत्वाचा प्रभाव विद्यार्थ्यांवर व्हावा. विद्यार्थ्यांनी स्वप्ने पाहिली पाहिजेत, त्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत त्यासाठी सकारात्मकृती असणं गरजेचं आहे. कधी कधी आयुष्यातील यू-टर्न देखील यशाच्या शिखरावर घेऊन जातो. पायलट व्हायचं स्वप्न पाहणारी एक व्यक्ती पायलट परिक्षेच्या अंतिम मुलाखतीत अनुत्तीर्ण झाली म्हणून न निराश होता अभ्यास करून शास्त्रज्ञ आणि नंतर राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम झाले. विद्यार्थ्यांनी न्यूनगंड बाजूला सारून आत्मविश्वास मजबूत बनवावा.” असे विचार व्यक्त करत त्यांनी यशस्वी स्पर्धकांचे अभिनंदन केले.
संस्थाप्रार्थनेने सुरू झालेल्या या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. डी. ए. यादव तर वांग्मय मंडळ सदस्य प्रा. रोहित शिंगे यांनी सप्ताहातील स्पर्धांचा अहवाल व निकाल वाचन केले. आभार डॉ. पी. के. वाघमारे यांनी आभार मानले. यावेळी महाविद्यालयातील प्राध्यापक, प्राध्यापिका, विद्यार्थी, विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सुत्रसंचालन डॉ. अंजली उबाळे यांनी केले.

Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800