प्रसारमाध्यमांतील शेकडो करीअरच्या संधी विद्यार्थ्यांच्या प्रतिक्षेत… : डॉ. अरूण शिंदे व डॉ. उत्तम जाधव.प्रसार माध्यमातील रोजगाराच्या संधी या विषयावरील कार्यशाळा संपन्न
इचलकरंजी :
येथील दत्ताजीराव कदम आर्ट्स, सायन्स अँड कॉमर्स कॉलेज मधील मराठी विभागाच्या वतीने शिवाजी विद्यापीठ अग्रणी महाविद्यालय क्लस्टर योजनेअंतर्गत ‘प्रसारमाध्यमांतील रोजगाराच्या संधी’ या विषयावर एकदिवसीय कार्यशाळा संपन्न झाली. या कार्यशाळेचे उद्घाटन प्राचार्य डॉ. एस. एम. मणेर यांच्या हस्ते आणि प्रमुख वक्ते प्रा. डॉ. अरुण शिंदे आणि डॉ. उत्तम जाधव यांच्या उपस्थितीत संपन्न झाले.
उद्घाटन सत्रामध्ये मार्गदर्शन करताना प्राचार्य डॉ. एस. एम. मणेर म्हणाले, “वर्गातील शिक्षण तुम्हाला समृद्ध बनवत असतेच. परंतु त्या शिक्षणाचा करिअर आणि अर्थार्जनाच्या अनुषंगाने विद्यार्थी किती विचार करतात हा चिंतनाचा विषय आहे. अशा काळात भाषा, माध्यमे आणि त्यातून रोजगाराच्या संधी या विषयावरील कार्यशाळा विद्यार्थ्यांच्या मध्ये त्यांचे भविष्य सक्षम करण्याच्या अनुषंगाने त्यांना प्रेरित करत असतात. विद्यापीठाची अग्रणी महाविद्यालयाची संकल्पना ही त्या अनुषंगाने काम करत आहे.”
कार्यशाळेच्या दुसऱ्या सत्रामध्ये बोलताना प्रा. डॉ. अरुण शिंदे म्हणाले, “बदलत्या काळाबरोबर माध्यमांचे बदललेले स्वरूप परंपरेने पत्रकारिता करणाऱ्या माध्यमकर्मींना स्वतःमध्ये बदल करून काम करावयाचे आहे. अशा काळात तुमच्यासारख्या तरुणांनी या क्षेत्रात येऊन आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरत पत्रकारिता क्षेत्रामध्ये यायला हवे. संवेदनशीलता आणि शोध पत्रकारिता या दोन गोष्टींच्या आधारे माध्यमांमध्ये स्वतःचं अस्तित्व निर्माण करण्यासारख्या खूप मोठ्या संधी आहेत. याकडे विद्यार्थ्यांनी डोळसपणे पाहायला हवे”
तिसऱ्या सत्रामध्ये बोलताना डॉ. उत्तम जाधव म्हणाले, ” २१ वे शतक हे तंत्रज्ञानाचे शतक आहे. काळानुसार बातम्यांचे स्वरूप बदलले. कालची बातमी आजच्या वर्तमानपत्रात येण्याचे दिवस बाजूला गेलेत. अशा काळात आजची बातमी आज किंवा कमीत कमी वेळेत लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी माध्यमांमध्ये विविध प्लॅटफॉर्म तयार झालेले आहेत. आजघडीला वृत्तपत्रकारिता, आकाशवाणी, इलेक्ट्रॉनिक मीडिया याबरोबरच न्यूज पोर्टल, ऑनलाइन न्यूज चैनल व युट्युब सारख्या क्षेत्रात सुद्धा खूप मोठ्या संधी आहेत. स्वतःचे कौशल्य जगासमोर आणण्यासाठी स्वतःकडे पर्याय आहेत. याचा विचार गांभीर्याने विद्यार्थ्यांनी करून करिअर बनवण्याचा प्रयत्न करायला हवा.” या कार्यशाळेसाठी अग्रणी महाविद्यालय क्लस्टर मधील १० महाविद्यालयातील ५० हून अधिक विद्यार्थी आणि प्राध्यापक सहभागी होते. समारोप सत्रामध्ये प्रा. डी. ए. यादव आणि मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र वितरित करण्यात आले.
संस्था प्रार्थना आणि दीपप्रज्वलाने सुरू झालेल्या या कार्यशाळेचे स्वागत, प्रास्ताविक आणि पाहुण्यांचा परिचय कार्यशाळेचे संयोजक प्रो. डॉ. सुभाष जाधव यांनी केले तर अग्रणी महाविद्यालयाच्या समन्वयक डॉ. एच. एन. शेख यांनी अग्रणी महाविद्यालयाची संकल्पना मांडली. कार्यक्रमाचे आभार प्रा. रोहित शिंगे यांनी मानले. तर सूत्रसंचालन प्रा. भारती कोळेकर यांनी केले. यावेळी कार्यशाळेच्या निमित्ताने प्राध्यापक व विद्यार्थ्यांची प्रतिनिधिक मनोगते झाली. कार्यशाळेसाठी प्राध्यापक वर्ग, विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800