मातृभाषेचे संवर्धन हे आपले कर्तव्य आहे. – डॉ. रफिक सुरज मुल्ला-डी.के.ए.एस.सी कॉलेजमध्ये मराठी भाषा संवर्धन पंधरवडा अंतर्गत व्याख्यान संपन्न.
इचलकरंजी :
दत्ताजीराव कदम आर्ट्स , सायन्स अँड कॉमर्स कॉलेजमधील मराठी विभाग (पदवी व पदव्युत्तर) आणि दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने सामंजस्य करारांतर्गत मराठी भाषा संवर्धन पंधरवड्या’ निमित्त प्रसिद्ध साहित्यिक प्रा. (डॉ.) रफिक सुरज मुल्ला यांचे *”मराठी भाषा आणि रोजगाराच्या संधी “* या विषयावर व्याख्यान संपन्न झाले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. एम. मणेर हे समारंभाच्या अध्यक्षस्थानी होते.
या समारंभात बोलताना प्रमुख पाहुणे प्रा.डॉ. मुल्ला म्हणाले की, आपल्या सर्व भावना,आपली सगळी स्वप्ने आपण आपल्या मातृभाषेतच बघत असतो.”मुळातच मातृभाषेच्या संवर्धनासाठी एखादा पंधरवडा राखून ठेवून त्यामध्ये विविध उपक्रम राबवण्याची गरज निर्माण होणे ही बाब सर्वांना विचार करायला लावण्यासारखी आहे. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्याने आता मराठी भाषा संवर्धनाची गरजच भासू नये इतके मोठे मराठी भाषेविषयी कार्य येत्या काळात आपल्या सर्वांना करावे लागणार आहे. मराठी भाषेतील पदवी आणि पदव्युत्तर शिक्षणानंतर विविध प्रसारमाध्यमे, उद्योग आणि सेवा, शासकीय भाषा कार्यालय यामध्ये रोजगाराच्या असंख्य संधी भाषा अभ्यासकांसाठी आहेत. त्याचा सविस्तर अभ्यास करून विद्यार्थ्यांनी भाषेच्या आधारावर करिअर बनवण्यासाठी प्रयत्नशील असायला हवे.”
अध्यक्षीय मनोगतामध्ये प्राचार्य डॉ. मणेर म्हणाले, जन्मापासून माणसाची जडणघडण ज्या भाषेमध्ये होते ती माणसाची मातृभाषा असते. मराठी भाषा ही आपली मातृभाषा आहे ही गोष्ट नक्कीच आपल्यासाठी अभिमानाची आहे. मराठी भाषा आणि भाषेतील शेकडो बोली यामुळे एक समृद्ध भाषा म्हणून मराठीकडे पाहिले जाते. मराठी भाषेतील रोजगाराच्या संधी याबद्दल विद्यार्थ्यांनी गांभीर्याने विचार करून त्याकडे बघायला हवे. आपली मातृभाषा केवळ जगण्याची भाषा म्हणून मर्यादित न राहता आपल्या भाषेला रोजगाराची भाषा बनवता यायला हवे.”
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय मराठी विभाग प्रमुख प्रा. डॉ. सुभाष जाधव यांनी केले. आभार श्रीमती भारती कोळेकर यांनी मानले, तर सूत्रसंचालन श्री रोहित शिंगे यांनी केले. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील प्राध्यापक वर्ग, प्रशासकीय कर्मचारी मराठी (पदवी व पदव्युत्तर ) विभागाचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800