सांगली खुनातील आरोपींवर कठोर कारवाई करा,गुन्हेगारी रोखा, इचलकरंजीतील मोबाईल व्यावसायिकांची मागणी.
इचलकरंजी, दि. २९ जानेवारी – सांगली येथे घडलेल्या निर्घृण खुनाच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर इचलकरंजीतील मोबाईल शॉपी चालक व व्यापारी वर्गाने आरोपींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. याबाबतचे निवेदन इचलकरंजीतील व्यावसायिकांतर्फे मा. मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना मा. उपविभागीय अधिकारी यांच्या माध्यमातून देण्यात आले.
२६ जानेवारी रोजी सांगली बसस्थानक परिसरातील भैरवनाथ मोबाईल शॉपीमध्ये विपुलपुरी गोस्वामी या तरुणाची चार अल्पवयीन मुलांनी निर्घृण हत्या केली.स्क्रीनगार्ड लावण्यासाठी पैसे कमी न केल्याच्या शुल्लक कारणावरून या तरुणावर कोयता व चाकूने वार करण्यात आले. या घटनेने व्यापारी वर्गात तीव्र संतापाची भावना असून, इचलकरंजीतील मोबाईल व्यावसायिकांनी आरोपींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.
व्यावसायिकांनी दिलेल्या निवेदनात असे नमूद करण्यात आले की, “मोबाईल व्यवसाय हा जीवनावश्यक सेवेसारखा झाला असून संलग्न विक्री आणि दुरुस्तीचे व्यवसाय मोठ्या प्रमाणावर सुरू आहेत. परंतु,काही समाजविघातक प्रवृत्तीच्या व्यक्तींकडून या व्यावसायिकांना मानसिक व आर्थिक त्रास दिला जात आहे. सांगलीतील ही घटना ही अत्यंत दुर्दैवी असून,सर्व व्यापारी वर्ग याचा तीव्र शब्दांत निषेध करतो.”
पोलीस तपासात असे आढळले की, संशयित आरोपींनी खून करण्याआधी कृष्णा घाट परिसरात कोयता व चाकू घेऊन दहशत माजवणाऱ्या रिल्स तयार केल्या होत्या. त्यामुळे अशा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या तरुणांवर कठोर कारवाई करणे गरजेचे आहे, अशी मागणी करण्यात आली आहे.
यावेळी मोबाईल दुकानदारांनी प्रशासनाला आवाहन करत म्हटले की, “मोबाईल व्यवसायाशी संबंधित व्यापाऱ्यांना सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून सहकार्य करण्यात यावे. तसेच, अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात.”नशेखोरी रोखण्यासाठीही प्रयत्न केले जावेत.
यावेळी विपुलपुरी गोस्वामी यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
निवेदन नायब तहसीलदार संजय काटकर यांच्याकडे देण्यात आले त्यांनी याबाबत त्वरित उपाययोजना करण्यासाठी शासनास कळवण्याचे आश्वासन उपस्थितांना दिले.
यावेळी मोबाईल होलसेलर व रिटेलर असोसिएशनचे अध्यक्ष अभिजित पटवा,उपाध्यक्ष कुमार खोत, सचिव मुबारक शेख,खजिनदार प्रथमेश साळुंखे,हंसराज खत्री,दिपेंद्र पाटणी,सुलेमान मकानदार,विनय भेंडवडे,अमोल ढवळे,लक्ष्मीकांत खंडेलवाल,श्रीरंग गाडदी,प्रकाश खटवटे,संदीप पाटील,भुजबली पाटील,सुशांत चौगुले,विजय रानभरे,सुशांत कोळी,संदीप थोरात यांच्यासह मोठ्या संख्येने मोबाईल दुकानदार उपस्थित होते.

Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800