पन्हाळगड ईदगाह मैदानावरील अनाधिकृत बांधकामाचे वृत्त खोटे-कोल्हापूर पोलीस दलाची नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन
कोल्हापूर – किल्ले पन्हाळगडावरील ईदगाह मैदान येथे अनधिकृत मजारचे बांधकाम सुरू असल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या प्रकरणाची गंभीर दखल घेत प्रशासनाने तत्काळ तपासणी करून वस्तुस्थिती स्पष्ट केली आहे.
निवासी नायब तहसीलदार श्री. वळवी, पन्हाळा वन विभागाचे आर.एफ.ओ. श्री. अनिल मोहिते आणि पन्हाळा पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी संयुक्त पाहणी केली. तपासणी दरम्यान ईदगाह मैदान परिसरात कोणतेही बांधकाम सुरू नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
आर.एफ.ओ. अनिल मोहिते यांनी सांगितले की, ईदगाह मैदान हे वन विभागाच्या अखत्यारीत असून, या ठिकाणी कोणतेही अनधिकृत बांधकाम चालू नाही. त्यामुळे सोशल मीडियावर पसरवलेली माहिती निराधार आहे.
कोल्हापूर जिल्हा पोलीस दलाने नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले असून, समाजात संभ्रम निर्माण करणाऱ्या खोट्या पोस्ट आणि व्हिडिओ प्रसारित करणाऱ्यांविरोधात कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा दिला आहे.

Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800