इचलकरंजीत सुवर्णमहोत्सवी स्मृतिजागर समितीच्या वतीने कविसम्मेलन संपन्न.
इचलकरंजी:
” समईतल्या वातीस वारा देतसे आव्हान जर
काही दिवे विझले तरी जळणे कधी सोडू नये…
शहरात धुंदी यायला लागे जराही वेळ ना
माती जिथे अपुली नसे त्या गावचे होऊ नये….
अशी कविता सादर करत उपविभागीय पोलीस अधिकारी समीरसिंह साळवे म्हणाले,ज्या शहराला साहित्यिक सांस्कृतिक मोठी परंपरा असते आणि ज्या शहरातले लोक अशा साहित्यिक संस्कृतिक समारंभाचे सोहळे साजरे करतात ते गाव खऱ्या अर्थाने श्रीमंत असते याची अनुभूती मागील जवळजवळ दोन वर्ष या शहरात अधिकारी म्हणून काम करताना घेतलेले आहेत. समृद्ध वारसा असणाऱ्या या गावात साहित्य कला याबरोबर साहित्यिक आणि कलावंतांवर प्रचंड प्रेम करणारे रसिक आहेत ही गोष्ट आनंद देणारी आहे. ते सुवर्ण महोत्सवी स्मृती जागर संमेलन समितीच्या वतीने आयोजित कवी संमेलनाच्या अध्यक्षस्थानावरून बोलत होते. पु. ल. देशपांडे व श्रीमंत नारायण बाबासाहेब घोरपडे सरकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कवी संमेलनाचे उद्घाटन करण्यात आले.
प्रारंभी स्मृती जागर समितीचे निमंत्रक दिलीप शेंडे यांनी प्रास्ताविकातून या संमेलनाच्या आयोजनामागील भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व पु. ल. देशपांडे यांच्या अध्यक्षतेखाली १९७४ साली झालेल्या सुवर्णमहोत्सवी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा स्मृती जागर सोहळा २६ डिसेंबर २०२४ रोजी इचलकरंजीत मोठ्या थाटामाटात संपन्न झाला. हा स्मृतीजागर आगामी वर्षभर प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात साजरा करण्यात येणार आहे. यातील पहिला कार्यक्रम या कवीसंमेलनाचा होत आहे. पुढील प्रत्येक महिन्यात होणाऱ्या कार्यक्रमातही इचलकरंजी परिसरातील साहित्य कला रसिकांनी सहभागी व्हावे.प्रसाद कुलकर्णी यांनी सर्व मान्यवरांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत केले.
या कवी संमेलनात वैशाली नायकवडी, दिनकर खाडे, ऍड. माधुरी काजवे, ए. बी. कांबळे, महेश सटाले, स्वप्नाली ढोणूक्षे आदींनी आपल्या आशयसंपन्न उत्तमोत्तम कविता सादर केल्या. प्रा. रोहित शिंगे यांनी कवी संमेलनासह एकूण कार्यक्रमाचे अतिशय बहारदार सूत्रसंचालन केले.दिलीप व दिपश्री शेंडे यांच्या ‘ स्वानंदी ‘ निवासस्थानी झालेल्या या कार्यक्रमास सुषमा दातार, डॉ.सुजित सौंदत्तीकर, शंकर उडपी,जीवन बरगे , सुवर्णा पवार,राहुल राजापूरे, अरुण काशीद,रवींद्र पडवळे, वैशाली राऊत, आरती लाटणे, दिग्विजय म्हामणे यांच्यासह अनेक रसिक उपस्थित होते.

Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800