मानवाच्या वेदनेतून जे शब्द उमटतात ते खरं साहित्य असतं-मा.श्री कृष्णात खोत(“रिंगण” साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त लेखक)
श्रीमती आ रा पाटील कन्या महाविद्यालयात वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात संपन्न….
इचलकरंजी
येथील श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित श्रीमती आक्काताई रामगोंडा पाटील कन्या महाविद्यालयात वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
यावेळी साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त लेखक मा श्री कृष्णात खोत हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
यावेळी बोलताना त्यांनी, सामाजिक शैक्षणिक, साहित्यिक संदर्भांचा उल्लेख करत विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले.
वेदना जेव्हा अंत:करणांमध्ये रूजते आणि त्यातून जे शब्द उमटतात तेच खरं साहित्य असतं, आणि असं साहित्य आपलं जगणं समृद्ध करत असतं.
आयुष्यामध्ये माणसाच्या सुखा समाधानाने जगण्याच्या व्याख्या बदललेल्या आहेत.जुन्या काळातील सुखाची व्याख्या आणि सध्या माणसाची सुखाची व्याख्या बदललेली आहे. आपली वेशभूषा बदलली, आपले विचार बदलले, याशिवाय आपली चवही बदलली त्यामुळे हे येणाऱ्या पिढीसाठी घातक आहे त्यामुळे आपल्या विचारांमध्ये सकारात्मक बदल होणे ही काळाची गरज आहे, कारण मोबाईल आणि आधुनिक साधनांचा जास्तीत जास्त वापर आपल्याला पुस्तकांपासून दूर नेतो, आणि ती आपल्यासाठी धोक्याची घंटा आहे,त्यामुळे मोबाईल पासून थोडेसे दूर होऊन आपण पुस्तकांशी मैत्री केली पाहिजे, असे ते म्हणाले.
पुस्तकातून तुम्हांला अनेक आदर्श व्यक्तिमत्व भेटतील, ज्यामुळे तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये खूप काही चांगलं करू शकाल, अश्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी अध्यक्षीय मनोगत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बाबासाहेब दुधाळे यांनी व्यक्त केले.
वार्षिक पारितोषिक वितरण म्हणजे वर्षभर सर्व विद्यार्थिनी,गुरुदेव कार्यकर्ते आणि प्रशासकीय सेवक शिक्षकेतर कर्मचारी यांनी केलेल्या कार्याचा गौरव करण्यासाठीचा दिवस असतो, गेले आठ दिवस आपण याची तयारी करतोय आणि आज हा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. हे यश तुमचंच आहे. बक्षीस मिळालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे मी अभिनंदन करतो आणि भावी वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा देतो, असे ते म्हणाले.
यावेळी वार्षिक पारितोषिक वितरण समारंभाच्या स्वागताध्यक्ष प्रो.डॉ.त्रिशला कदम यांनी वार्षिक अहवालाचे वाचन केले. जिमखाना विभाग प्रमुख डॉ.सविता भोसले यांनी क्रीडा विभागाच्या अहवालाचे वाचन केले.
विविध विभागांमध्ये,वार्षिक क्रीडा प्रकारांमध्ये विभागीय तसेच राज्यस्तरावरती बक्षीस प्राप्त विद्यार्थ्यांचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. दुपारच्या सत्रात विद्यार्थिनींच्या कलागुणांना वाव देणारा विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ.विठ्ठल नाईक यांनी केले. यावेळी नॅक कॉर्डिनेटर श्री सुधाकर इंडी ज्युनिअर जिमखाना विभाग प्रमुख श्री प्रकाश मुडशी,श्री अनिल कुंभार उपस्थित होते.
सूत्रसंचालन प्रा.संदीप पाटील आणि प्रा.वर्षा पोतदार यांनी केले तर आभार सौ. एकता जाधव यांनी मानले.
यावेळी महाविद्यालयातील शिक्षक,कार्यकर्ते,प्रशासकीय सेवक शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थिनी बहुसंख्येने उपस्थित होत्या.

Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800