इचलकरंजीत मंगळवारपासून चार दिवस मराठी दिन महोत्सव
इचलकरंजी:
येथील मनोरंजन मंडळ, श्री दगडूलाल मर्दा फाउंडेशन, रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी सेंट्रल आणि अ. भा. मराठी नाट्य परिषद इचलकरंजी शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने कविश्रेष्ठ कुसुमाग्रज जन्मदिन – मराठी भाषा दिवसानिमित्त दिनांक २५ ते २८ फेब्रुवारी २०२५ या काळात मराठी दिन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
शालेय विद्यार्थ्यांमध्ये नाट्यकलेची आवड निर्माण व्हावी त्याचबरोबर मराठी भाषेविषयी आवड निर्माण व्हावी याकरिता या उपक्रमात मंगळवार दिनांक २५ फेब्रुवारी रोजी ‘बालनाट्य उत्सव’ आयोजित केला आहे. यामध्ये बालरसिक विद्यार्थी आणि पालकांनीही आवर्जून पहावीत अशी, विविध ठिकाणच्या स्पर्धेमध्ये यश मिळविणारी तीन बालनाट्ये सादर करण्यात येणार आहेत. यावेळी रसिक कला मंच आणि निर्मिती नाट्य संस्था सातारा प्रस्तुत ‘पार्टी’, सस्नेह कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळ सांगली प्रस्तुत ‘सुखी सदऱ्याचा शोध’ आणि सौ. सुंदराबाई शंकरलाल मालू हायस्कूल, हरिपूर प्रस्तुत ‘जादूचा दिवा’ ही बालनाट्ये आयोजित केली आहेत.
बुधवार दिनांक २६ फेब्रुवारी रोजी रात्री ९•१५ वाजता राज्य नाट्य स्पर्धा आणि विविध नाट्यमहोत्सवात रसिकांनी व समीक्षकांनी कौतुक केलेले तसेच कोल्हापूर विभाग कामगार राज्य नाट्य स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविणारे ‘तिचे संदर्भ नसलेली गोष्ट’ हे नाटक सादर होणार आहे. मूळ कथा राजन खान यांची असून डॉ. प्रमोद खाडिलकर यांनी नाट्य रूपांतर केले आहे. दिग्दर्शन पायल पांडे यांचे आहे तर प्रताप सोनाळे यांनी मार्गदर्शन केले आहे. संतोष आबाळे आणि मानसी कुलकर्णी यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
या उपक्रमात गुरुवार दिनांक २७ फेब्रुवारी रोजी रात्री ९•१५ वाजता मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याबद्दल मराठी भाषेची वाटचाल दाखविणारा, श्रवणीय गीतांवरील समुह नृत्ये आणि गीत संगीताचा ‘इये मराठीची नगरी’ हा सुरेल कार्यक्रम होणार आहे. यामध्ये संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरांपासून आजच्या प्रतिभासंपन्न कवींपर्यंत प्रातिनिधिक गीतकारांची निवडक गाणी सादर होणार आहेत. या कार्यक्रमात पदन्यास नृत्यकला अकादमीच्या सायली होगाडे यांच्या विद्यार्थिनी कलाकार तसेच महेश हिरेमठ व सहकलाकार कोल्हापूर यांचा सहभाग आहे.
उपक्रमाच्या समारोपाच्या दिवशी शुक्रवार दिनांक २८ फेब्रुवारी रोजी रात्री ९•१५ वाजता दोन एकांकिका सादर होणार आहेत. यामध्ये गायन समाज देवल क्लब कोल्हापूर प्रस्तुत ‘अलमोस्ट डेड’ आणि फोर्थ वॉल थिएटर इचलकरंजी प्रस्तुत ‘लॉटरी’ या एकांकिका आहेत. युवा कलाकारांच्या संचातील या एकांकिकांनी महाराष्ट्रातील विविध ठिकाणी अनेक राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त केले आहेत. सदरचे सर्व कार्यक्रम येथील श्रीमंत घोरपडे नाट्यगृहात होणार असून सर्व कार्यक्रमांसाठी प्रवेश विनामूल्य आहे. नाट्य रसिकांनी मित्र परिवारासह उपस्थित राहावे असे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800