पथनाट्य स्पर्धेत मंडलिक कॉलेज प्रथम तर लघुनाटिका स्पर्धेत कला स्पंदन क्रिएशन प्रथम
इचलकरंजी –
येथील मनोरंजन मंडळ, श्री दगडूलाल मर्दा फाउंडेशन आणि रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी सेंट्रल यांच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय युवास्पंदन स्पर्धा उपक्रमाच्या समारोपाच्या दिवशी आविष्कार- पथनाट्य स्पर्धेतील प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मंडलिक कॉलेज, मुरगुड यांनी मिळविले तर लघुनाटिका स्पर्धेतील प्रथम क्रमांक पारितोषिक कला स्पंदन क्रिएशन, पाटण या संघाने मिळविले.
पथनाट्य स्पर्धेत भाग घेतलेल्या संघानी भ्रष्टाचार, संविधान साक्षरता, पर्यावरण व आरोग्य, जातीयवाद, धर्मांधता, इत्यादी विषयांवर परखड भाष्य करणारी प्रबोधनपर पथनाट्ये सादर केली. या स्पर्धेत नानासाहेब महाडिक शैक्षणिक संकुल, पेठनाका या संघाने द्वितीय क्रमांक प्राप्त केला तर कला स्पंदन क्रिएशन, पाटण या संघाने तिसरा क्रमांक मिळविला.
लघुनाटिका स्पर्धेतील संघानी समाजातील सद्यस्थिती, सोशल मीडिया, मराठी भाषेची सद्यस्थिती, स्त्री पुरुष समानता, व्यसनमुक्ती, इत्यादी विषय प्रबोधन, उपहास, उपरोध आणि विडंबन अशा विविध शैलीमधून मांडले. या स्पर्धेतील द्वितीय क्रमांक परीसस्पर्श, कराड या संघाने मिळविला तर तृतीय क्रमांक विवेकानंद कॉलेज कोल्हापूर यांनी प्राप्त केला. नानासाहेब महाडिक शैक्षणिक संकुल या संघाने उत्तेजनार्थ क्रमांक मिळविला.
सदरच्या दोन्ही स्पर्धांसाठी परीक्षक म्हणून प्रकाश पाटील राधानगरी, सत्याप्पा मोरे इस्लामपूर आणि प्रवीण साळुंखे पुणे यांनी जबाबदारी पार पाडली. सुरुवातीला स्पर्धा समन्वयक संजय होगाडे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले तर मनोरंजन मंडळाचे अध्यक्ष समीर गोवंडे यांच्या हस्ते परीक्षकांना गुलाब पुष्प प्रदान करण्यात आले. यावेळी सर्व परीक्षकांच्या हस्ते नटराज प्रतिमा पूजन करण्यात आले. सूत्र संचालन कपिल पिसे यांनी केले तर परीक्षकांचा परिचय पंडित ढवळे यांनी करून दिला.
स्पर्धा समारोपप्रसंगी सर्व परीक्षक तसेच संयोजक पदाधिकारी यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले. याप्रसंगी सर्व परीक्षकांनी विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त असे मार्गदर्शन केले त्याचबरोबर “अभिनय कला, नाट्यकला ही युवकांना ऊर्जा देणारी कला असून त्यांनी या क्षेत्रात यश मिळविण्यासाठी सातत्याने कलेची आराधना आणि सराव करीत राहणे आवश्यक आहे” अशी अपेक्षा व्यक्त केली. पथनाट्य स्पर्धेचे सूत्र संचालन सचिन चौधरी व निखिल शिंदे यांनी केले तर लघुनाटिका स्पर्धेचे सूत्र संचालन मानसी कुलकर्णी व आविष्कार कांबळे यांनी केले. महेश सोलापूरे व श्रेया सवदी यांनी स्पर्धा व्यवस्थापन केले. सदरच्या स्पर्धा येथील श्रीमंत घोरपडे नाट्यगृह परिसर आणि सभागृहात संपन्न झाल्या. या स्पर्धेत इचलकरंजी, कोल्हापूर, सांगली, कराड, इस्लामपूर या भागातील स्पर्धकांनी सहभाग घेतला.
युवा स्पंदन आविष्कार – लघुनाटिका स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविणारा संघ

Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800