इये मराठीचिये नगरी’… मनोरम कलाविष्कारास रसिकांची दाद
इचलकरंजी –
येथे मराठी दिन महोत्सवानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या ‘इये मराठीचिये नगरी’ या मराठी भाषेची गौरवास्पद वाटचाल दाखविणाऱ्या समुहनृत्ये आणि गीत संगीताच्या मनोरम कलाविष्काराने रसिकांची उत्स्फूर्त दाद मिळविली. विविध शैलीतील गीतांवरील देखणा नृत्याविष्कार आणि सुरेल गीत संगीताचा मनोहारी कार्यक्रम रसिकांना आनंद देणारा ठरला. मराठीतील संत ज्ञानेश्वरांपासून आजच्या दर्जेदार कवींपर्यंत प्रातिनिधिक गीतकारांच्या निवडक गाण्यांवर तशाच कौशल्याने दिग्दर्शीत केलेले नृत्याविष्कार त्याचबरोबर गायक, वादक कलाकारांनी सादर केलेली श्रवणीय गाणी आणि अभ्यासपूर्ण व ओघवते निवेदन यामुळे सलग अडीच तासाचा हा कार्यक्रम रंगतदार आणि रसिकांचा प्रतिसाद मिळविणारा झाला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रमुख पाहुणे येथील ए. आर. तांबे त्याचबरोबर अतुल शहा आणि पवन लोकरे यांच्या आणि इतर मान्यवरांच्या दीप प्रज्वलन आणि नटराज प्रतिमा पूजन करण्यात आले. याप्रसंगी बोलताना तांबे यांनी “महाराष्ट्राची भाषा व संस्कृती समृद्ध आणि संपन्न असून अशा प्रकारच्या कार्यक्रमांच्या माध्यमातून ती वृद्धिंगत करण्याचे काम कौतुकास्पद आहे” अशा प्रकारचे उद्गार काढले. यावेळी अतुल शहा यांनी शुभेच्छा व्यक्त करताना “अधिकाधिक रसिकांनी सांस्कृतिक कार्यक्रमांना प्रतिसाद द्यावा” अशी अपेक्षा व्यक्त केली.
यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाच्या नृत्य दिग्दर्शिका सौ. सायली होगाडे, निवेदन लेखिका सौ. चित्कला कुलकर्णी आणि गायक महेश हिरेमठ, कोल्हापूर तसेच संयोजक पदाधिकारी उपस्थित होते. मर्दा फाउंडेशनचे विश्वस्त शामसुंदर मर्दा आणि मनोरंजन मंडळाचे अध्यक्ष समीर गोवंडे यांच्या हस्ते पाहुण्यांना गुलाब पुष्प व भेटवस्तू प्रदान करण्यात आली. रोटरी क्लब सेंट्रलचे अध्यक्ष सतीश पाटील यांनी स्वागतपर मनोगत व्यक्त केले तर उपक्रम समन्वयक उमेश कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले. संतोष आबाळे यांनी सूत्रसंचालन केले.
कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनानिमित्त मायबोली या उपक्रमाच्या अंतर्गत सदरच्या कार्यक्रमात छोट्या मुलींपासून विद्यार्थिनी, युवती आणि महिला कलाकारांनी सुरेख नृत्याविष्कार सादर केले. त्यामधील विविध रचना आणि अतिशय अनुरूप अशी वेशभूषा त्याचबरोबर निमशास्त्रीय नृत्याविष्कार या सर्व समन्वयामुळे कार्यक्रमातील सर्व नृत्यांनी रसिकांची दाद घेतली. नटरंग उभा या नटराज वंदनेपासून शेवटी सादर करण्यात आलेल्या लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी या गाण्यापर्यंत सर्व कार्यक्रम रसिकांना भावणारा झाला.
अतिशय छोट्या मुलींनी सादर केलेले इल्लू इल्लू पिल्लू गं, विद्यार्थिनींनी सादर केलेले सरीवर सरी, युवतींनी सादर केलेली सावर रे मना, त्याचबरोबर युवती व महिलांनी सादर केलेली अजि सोनियाचा दिनु, वैकुंठ नायका हे अभंग, तसेच ही मायभूमी ही जन्मभूमी, उदे ग अंबे उदे आणि वंदन हो अशा विविध शैलीमधील गीतांवर समूह नृत्य स्वरूपातील उत्तम कलाविष्कार सादर करण्यात आला. या नृत्यांचे दिग्दर्शन सौ. सायली होगाडे यांनी केले होते.
कार्यक्रमातील गीत गायनाची जबाबदारी कोल्हापूरचे प्रसिद्ध गायक महेश हिरेमठ आणि त्यांच्या सर्व सहकारी गायक, गायिका आणि वादकांनी अतिशय चांगल्या प्रकारे पार पाडली. हिरेमठ यांच्याबरोबर रणजीत बुगुले, शुभांगी जोशी व शीतल जोशी हे गायक कलाकार होते. त्यांनी प्रेम पिसे भरले अंगी, बाजीप्रभूंचा पोवाडा, गर्द सभोती रान, कठीण कठीण कठीण किती, नाही कशी म्हणू तुला, सेतू बांधा रे, येशील येशील, गोमू संगतीने, या जन्मावर या जगण्यावर, वाटा वाटा वाटा गं अशी वेगवेगळ्या प्रकारची गाणी उत्तम रीतीने सादर केली. याबरोबरच प्रा. अशोक दास यांनी केशवसुत व विंदा करंदीकर यांच्या कविता सादर केल्या तर संतोष आबाळे यांनी नटसम्राट मधील मनोगत साभिनय, प्रभावीपणे सादर केले. दोघांनाही रसिकांचा प्रतिसाद लाभला. कार्यक्रमाच्या निवेदनाची जबाबदारी सौ. चित्कला कुलकर्णी, समीर गोवंडे आणि आबाळे यांनी उत्कृष्टपणे पार पाडली.
कार्यक्रमात सादर करण्यात आलेल्या नृत्याविष्कारामध्ये रुक्षिका बसूदे,सानवी कोंडेकर,सावी कुलकर्णी,स्पृहा जोशी,साची सोनटक्के,पालवी भिसे,दक्षा विभूते,परी माळी,कनक होगाडे,सृष्टी उपाध्ये,सौंदर्या उपाध्ये,जिगीषा बंब,स्वराली जामदार,आराध्या पानारी,मृणाल तोरो,रिद्धी चौगुले,काव्या शिंदे,सायली होगाडे,आर्या चांदेकर,पल्लवी खैरनार,धनश्री होगाडे,पूजा बसूदे,सिद्धी भस्मे,साक्षी बारवाडे,रेशमा कोंडेकर,गंधाली राशिनकर,अमृता फाटक, गीता भागवत,वैष्णवी डाके,नेहा सातपुते,श्वेता कुलकर्णी, सोनाली होगाडे,सायली काकडे,भक्ती सोनटक्के,साक्षी शहा, प्रियांका कदम,प्रणाली पोतदार,तिलोत्तम नुली,तन्वी ठिगळे, अनुजा कामत,सोनाली कागे,श्रावणी नवनाळे,सायली सुतार, पूनम मट्टीकली,आशा मनोरळे,अंकिता उत्तुरकर,शितल सपाटे,दिपाली सपाटे आणि सचिन चौधरी व महेश सोलापुरे यांनी सहभाग घेतला.
कार्यक्रमातील पूरक अशी संगीत साथ सुनील गुरव (की बोर्ड), सचिन देसाई (ऑक्टोपॅड), स्वानंद जाधव (तबला व ढोलक) आणि महेश कदम (साईड रिदम) यांनी केली. वेशभूषा व रंगभूषा सायली होगाडे आणि सुनंदा डांगरे यांनी केली. कार्यक्रमाची उत्कृष्ट अशी ध्वनी आणि प्रकाश व्यवस्था प्रशांत होगाडे यांनी पाहिली. येथील श्रीमंत घोरपडे नाट्यगृहात झालेल्या कार्यक्रमास रसिक प्रेक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मायबोली कार्यक्रमात वैकुंठ नायका या गीतावरील समुह नृत्याविष्कार.

Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800