शुल्क नियामक प्राधिकरणाच्या अपारदर्शक कारभाराविरोधात १३ मार्चला आझाद मैदानात धरणे आंदोलन
मुंबई – महाराष्ट्रातील विनाअनुदानित तंत्रशिक्षण संस्थांच्या शुल्क निर्धारण प्रक्रियेत होत असलेल्या भ्रष्टाचाराविरोधात टॅफनॅप, मुक्ता, सारती आणि इतर समविचारी संघटनांच्या वतीने गुरुवार, १३ मार्च २०२५ रोजी आझाद मैदान, मुंबई येथे एक दिवसाचे धरणे आंदोलन आयोजित करण्यात आले आहे.
शुल्क नियामक प्राधिकरणाने (Fee Regulatory Authority – FRA) शिक्षण शुल्क ठरवताना संस्थांकडून मिळणाऱ्या प्रस्तावांची संपूर्ण माहिती त्यांच्या वेबसाइटवर प्रदर्शित करणे कायदेशीरदृष्ट्या बंधनकारक आहे. मात्र, प्राधिकरणाकडून या माहितीला दडपले जात असल्याचा आरोप संघटनांनी केला आहे.
१० हजार कोटींहून अधिक भ्रष्टाचाराचा आरोप
संघटनांच्या मते, महाराष्ट्रातील बहुतांश स्वयंपूर्ण शिक्षण संस्थांनी खोटी माहिती देऊन शुल्कवाढ करून घेतली आहे. फक्त अभियांत्रिकी शिक्षणाच्या शुल्कवाढीमधून दरवर्षी सुमारे १८०० कोटींचा भ्रष्टाचार होत असून, फार्मसी, मॅनेजमेंट, मेडिकल आणि इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांसह हा आकडा १० हजार कोटींच्यावर पोहोचतो.
शासनालाही आर्थिक फटका
या प्रकरणात सरकारही फसवले जात आहे, कारण मोठ्या प्रमाणावर शुल्काची भरपाई फ्रिशिप व शिष्यवृत्ती योजनांमधून सरकारी तिजोरीतून केली जाते. परिणामी, शासनाला दरवर्षी सुमारे ७ हजार कोटी रुपयांचा आर्थिक फटका बसतो, असा दावा करण्यात आला आहे.संघटनांच्या प्रमुख मागण्यात
प्रत्येक शिक्षण संस्थेने सादर केलेला शुल्क प्रस्ताव वेबसाइटवर प्रदर्शित करावा.प्रत्येक संस्थेच्या कर्मचाऱ्यांची संख्या, वेतन तपशील आणि उपलब्ध सुविधा याची तपासणी प्रत्यक्ष पाहणीद्वारे करण्यात यावी.हितसंबंधित घटकांच्या व्याख्येत पालक व विद्यार्थी संघटनांचा समावेश करून भ्रष्टाचारावरील तक्रारींची दखल घ्यावी.प्राधिकरणाच्या अपारदर्शक कारभाराची उच्चस्तरीय चौकशी करून जबाबदार अधिकाऱ्यांवर फौजदारी कारवाई करावी अशा आहेत
“शिक्षण हक्क व आर्थिक शुद्धतेसाठी हे आंदोलन महत्त्वाचे आहे. सर्वसामान्य विद्यार्थी व पालकांची होणारी लूट थांबवण्यासाठी लोकांनी मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी व्हावे,” असे आवाहन टॅफनॅपचे सचिव प्रा. श्रीधर वैद्य यांनी केले आहे.

Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800