डीकेएएससी मध्ये वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात संपन्न
इचलकरंजी :
येथील दत्ताजीराव कदम आर्ट्स, सायन्स अँड कॉमर्स महाविद्यालयाचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला. सुप्रसिद्ध कवी मा. नारायण पुरी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. महाविद्यालय विकास समितीचे मा. सुनील पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व प्राचार्य डॉ. एस. एम. मणेर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या या समारंभात महाविद्यालयातील सर्व यशस्वी खेळाडूंचा, गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना कवी नारायण पुरी म्हणाले, ” महाविद्यालयीन जीवन हे उरात ध्येय बाळगून त्या ध्येयासाठी संघर्ष करण्याचे दिवस असतात. तारुण्याच्या या वाटेवरून वाटचाल करत असताना कधीही आई-वडिलांनी आपल्यासाठी केलेले कष्ट याचा विसर पडू देऊ नये. संघर्षानंतर मिळणारे यश वेगळे समाधान घेऊन येते ते समाधान इथल्या प्रत्येक विद्यार्थ्याच्या वाट्याला यावे. स्वतःला, कुटुंबाला, समाजाला आणि देशाला अभिमान वाटेल असे कार्य करत रहा.” अशा स्वरूपाच्या भावना व्यक्त करत त्यांनी आपल्या बोली आणि पहाडी आवाजाच्या अनेक गेय कवितांनी विद्यार्थ्यांना मंत्रमुग्ध केले. अध्यक्षीय मनोगतामध्ये मा. सुनील पाटील यांनी आपल्या मनोगतात सर्व यशस्वी खेळाडू आणि गुण विद्यार्थ्यांचा गौरव करत महाविद्यालयासाठी आणि विद्यार्थ्यांसाठी नेहमी सोबत असण्याचा विश्वास देत विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
दीपप्रज्वलन आणि संस्था प्रार्थनेने सुरू झालेल्या या समारंभाचे स्वागत व प्रास्ताविक मा. प्राचार्य डॉ. एस. एम. मणेर यांनी केले. पहिल्या सत्रात शेलापागोटे वाचनाचा कार्यक्रम झाला. मुख्य समारंभात कार्यक्रमाचे कार्याध्यक्ष प्रा. डी. ए. यादव यांनी महाविद्यालयाचा जनरल अहवाल तर, प्रा. मुजफ्फर लगीवाले व प्रा. लेफ्टनंट विनायक भोई यांनी जिमखाना विभागाचे अहवाल वाचन केले. या समारंभास महाविद्यालयातील प्राध्यापक, प्राध्यापिका, विद्यार्थी, विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रा. लेफ्टनंट विनायक भोई यांनी मानले. सूत्रसंचालन प्रा. रोहित शिंगे यांनी केले.
फोटो-वार्षिक पारितोषिक वितरण समारंभात बोलताना कवी नारायण पुरी. यावेळी उपस्थित मा. सुनील पाटील, प्राचार्य डॉ. एस. एम. मणेर, प्रा. डी. ए. यादव, प्रा. लेफ्टनंट विनायक भोई, प्रा. मुजफ्फर लगीवाले

Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800