आमदार राहुल आवाडे यांच्या प्रयत्नाने
कोल्हापूर जिल्ह्यातील ४७ हजार नागरिकांना मिळणार धान्य
इचलकरंजी –
वाढत्या लोकसंख्येच्या प्रमाणात जनतेला स्वस्त अन्नधान्य उपलब्ध व्हावे यासाठी अंत्योदय आणि प्राधान्य कुटुंब योजना अंतर्गत संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यासाठी इष्टांक वाढवून मिळण्याबाबत आमदार राहुल आवाडे यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे. या संदर्भात शासनाच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या वतीने सुधारीत वाढीव इष्टांक संदर्भातील अध्यादेश जारी करण्यात आला आहे. त्यानुसार कोल्हापूर जिल्ह्यातील 47 हजार नागरिकांना रेशनवरील मोफत धान्य मिळणार आहे.
इचलकरंजी ही कामगार नगरी असून याठिकाणी देशभरातील विविध राज्यातील कानाकोपर्यातून उदरनिर्वाहाच्या निमित्ताने अनेक कुटुंबे याठिकाणी स्थायिक झाली आहेत. अशा कुटुंबांची संख्या प्रचंड असून ही सर्व कुटुंबे शासनाच्या रेशनधान्य दुकानातून मिळणार्या अन्नधान्यावरच अवलंबून आहेत. त्याचबरोबर कोल्हापूर जिल्ह्यातही बहुतांशी ग्रामीण भागातील गोरगरीब सर्वसामान्य जनता व कामगारवर्गाचा उदरनिर्वाहसुध्दा रेशनधान्यावरच चालतो. राज्यात राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम 2013 नुसार अंत्योदय व प्राधान्य कुटुंब लाभार्थी योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना रेशनवरील धान्य दिले जाते. परंतु विवाह आणि जन्मामुळे कुटुंबातील सदस्यांची संख्या वाढत चालल्याने सध्यस्थितीत राज्य शासनाकडून उपलब्ध करुन दिला जाणारा अन्नधान्य पुरवठा अपुरा पडतो. त्यामुळे राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत वंचित कुटूंबियांसाठी इचलकरंजीसह संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यासाठी आवश्यक तो इष्टांक वाढवून मिळण्याची मागणी आमदार राहुल आवाडे यांनी शासनाकडे केली होती. या संदर्भात संपूर्ण आकडेवारीसह माहिती सादर करुन तातडीने वाढीव इष्टांक मिळण्यासाठी त्यांनी पाठपुरावा सुरु ठेवला होता. त्यांच्या या प्रयत्नांना यश आले असून शासनाने कोल्हापूर जिल्ह्यासाठी ४७ हजार इतका इष्टांक वाढवून दिला आहे.
आमदार राहुल आवाडे यांच्या पाठपुराव्यानंतर या सुधारीत इष्टांक वाढीनुसार कोल्हापूर जिल्ह्यातील २३ लाख ९५ हजार ८९२ जणांना धान्य मिळणार आहे. यामध्ये अंत्योदय योजनेतील ५२ हजार ३३७ तर प्राधान्य कुटुंबातील २३ लाख ४३ हजार ५५५ जणांचा समावेश आहे. जिल्ह्यासाठी मंजूर झालेल्या ४७ हजार जादा इष्टांकाचे लवकरच कोल्हापूर व इचलकरंजी शहर आणि तालुकानिहाय वाटप केले जाणार आहे.

Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800