समर्पित जीवनाचा सन्मान — आवाडे दादांना ‘संस्काररत्न पुरस्कार’ प्रदान”
इचलकरंजी
दक्षिण भारत जैन सभेचे दिगंबर जैन बोर्डिंग, इचलकरंजी येथील श्री १००८ चंद्रप्रभू दिगंबर जैन मंदिराच्या रौप्य महोत्सवानिमित्त पंचकल्याणक प्रतिष्ठा महामहोत्सवाचे आयोजन करण्यात आले. या विशेष प्रसंगी सामाजिक क्षेत्रात अतुलनीय योगदान दिल्याबद्दल संस्काररत्न पुरस्कार आदरणीय कल्लाप्पाण्णा आवाडे (दादा) यांना सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला. यावेळी अक्षय हजारे यांनी तयार केलेली आवाडे दादांच्या जीवनपटावरील डॉक्युमेंटरी सादर करण्यात आली,मानपत्राचे वाचन तीर्थकर माणगावे सर यांनी केले.
कल्लाप्पाण्णा आवाडे यांनी आपल्या कर्तृत्वाने सहकार, राजकारण, शिक्षण, क्रीडा आणि समाजसेवा या विविध क्षेत्रात ठसा उमटवला आहे. शेतकरी कुटुंबात जन्म घेऊन विद्यार्थीदशेपासूनच सामाजिक आणि क्रीडा क्षेत्रात कार्यरत असलेल्या आवाडे यांनी इचलकरंजी नगराध्यक्षापासून राज्य मंत्री, खासदार आणि जागतिक पातळीवरील संघटनांमध्ये नेतृत्व केले आहे.
जनता सहकारी बँकेचे संस्थापक अध्यक्ष म्हणून ते लोकमान्य झाले. जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखाना, डीकेटीई शिक्षण संस्था, विविध सुतगिरण्या उभ्या करून त्यांनी इचलकरंजीचा औद्योगिक आणि शैक्षणिक चेहरा उजळवला. त्यांच्या नेतृत्वाखाली अनेक सहकारी संस्था आणि शैक्षणिक संस्थांनी भरभराट साधली.
जैन समाजाच्या अल्पसंख्यांक दर्जाच्या मागणीला यश मिळवून देण्यातही त्यांचे मोलाचे योगदान आहे. त्यांच्या दूरदृष्टीपूर्ण आणि पारदर्शक नेतृत्वामुळे त्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर ‘दि वर्ल्ड असोशिएशन ऑफ बीट अॅन्ड केन जोअर्स’ च्या उपाध्यक्षपदाचा सन्मानही मिळाला.
या सन्मानप्रसंगी सत्कारमूर्तींचा गौरव आचार्य १०८ श्री जीनसेन मुनी महाराज, आचार्य १०८ श्री चंद्रप्रभ सागर महाराज, परमपूज्य क्षुल्लकरत्न १०५ श्री समर्पण सागर महाराज, श्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी नांदणी यांच्या पावन सानिध्यात आणि प्रतिष्ठाचार्य पंडित डॉ. सम्मेद उपाध्ये यांच्या उपस्थितीत करण्यात आला.
कार्यक्रमावेळी माजी मंत्री प्रकाश आवाडे, किशोरी आवाडे, सपना आवाडे, रवी आवाडे, आदित्य आवाडे यांच्यासह पंचकल्याणक समितीचे रविंद्र पाटील, सुभाष बलवान, बाबासो हुपरे, चंद्रकांत पाटील आणि विविध राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आवाडे दादांचा सन्मान करताना आचार्य मुनींजी व पंचकल्याणक समिती पदाधिकारी

Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800