इचलकरंजीच्या महाविद्यालयांचा घवघवीत यश! ४ कॉलेजेसचा पुन्हा १००% निकाल
इचलकरंजी— नुकत्याच जाहीर झालेल्या बारावीच्या निकालात इचलकरंजी शहरातील चार नामांकित ज्युनिअर कॉलेजेसने सलग १०० टक्के निकालाची परंपरा कायम ठेवत यशाची आणखी एक नोंद केली आहे. इचलकरंजी हायस्कुल अॅन्ड ज्युनिअर कॉलेज, बिशप्स इंग्लिश स्कूल, व्यंकटराव हायस्कुल, आणि व्यंकटेश्वरा हायस्कुल अॅन्ड ज्युनिअर कॉलेज, कबनूर या चार संस्थांनी यंदाही सर्व विद्यार्थी उत्तीर्ण करून आपली शैक्षणिक गुणवत्ता सिद्ध केली.
निकालाची उत्सुकता सकाळपासूनच विद्यार्थ्यांमध्ये आणि पालकांमध्ये जाणवत होती. दुपारी १ वाजता निकाल ऑनलाइन जाहीर होताच शहरातील नेट कॅफे आणि मोबाईलवर निकाल पाहण्यासाठी मोठी गर्दी उसळली. काही ठिकाणी आनंदाचे क्षण साजरे करण्यात आले, तर काही ठिकाणी अपेक्षाभंगामुळे हलकासा खंतावलेला सूरही जाणवला.
या यशस्वी महाविद्यालयांच्या आवारात निकालानंतर आनंदाचे वातावरण निर्माण झाले. विद्यार्थ्यांना गुलाल उधळून, फटाके फोडून आणि मिठाई वाटून अभिनंदन करण्यात आले.
शहरातील इतर महाविद्यालयांनीही भरघोस यश मिळवले आहे. काही महाविद्यालयांचा निकाल पुढीलप्रमाणे:
- तात्यासो मुसळे हायस्कुल – 99.71%
- श्री बालाजी माध्यमिक विद्यालय – 99.61%
- मणेरे हायस्कूल – 99%
- श्रीमंत गंगामाई गर्ल्स हायस्कुल – 96.24%
- आक्काताई रामगोंडा पाटील महाविद्यालय – 95%
- ताराबाई गर्ल्स हायस्कुल – 96.15%
- रत्नदिप हायस्कुल – 82.14%
- कबनूर हायस्कुल – 85.71%
- दत्ताजीराव कदम ए.एस.सी. कॉलेज – 80.29%
याशिवाय गर्ल्स हायस्कूल ज्युनिअर कॉलेज ऑफ कॉमर्स, मयूर गर्ल्स हायस्कूल आणि दि न्यू हायस्कूल अॅन्ड ज्युनिअर कॉलेज यासारख्या संस्थांनीही यंदा उज्वल निकालाची परंपरा पुढे चालवली आहे.
शहरातील गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांचे आणि शिक्षकांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. हे यश संपूर्ण इचलकरंजीसाठी अभिमानाचे आहे.

Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800