इचलकरंजीत १२ मे पासून मनोरंजन व प्रबोधन व्याख्यानमाला,विविध क्षेत्रातील नामवंत वक्त्यांचा सहभाग
इचलकरंजी:
येथील साहित्यिक, सांस्कृतिक व सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेले मनोरंजन मंडळ, श्री दगडूलाल मर्दा फौंडेशन व रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी सेंट्रल यांच्या वतीने प्रतिवर्षीप्रमाणे मनोरंजन व प्रबोधन व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली आहे. व्याख्यानमालेचे हे ४७वे वर्ष असून या उपक्रमास तुळजाराम सुरचंद शहा यांचे सहकार्य लाभले आहे. दिनांक १२ मे पासून २१ मे २०२५ पर्यंत ही व्याख्यानमला येथील श्रीमंत घोरपडे नाट्यगृहामध्ये दररोज रात्री ९•३० वाजता होणार आहे. या दहा दिवसात वेगवेगळ्या क्षेत्रातील तसेच विविध भागातील नामवंत वक्ते आणि कलाकार यामध्ये सहभागी होणार आहेत.
ह्या यावर्षीच्या व्याख्यानमालेसाठी कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखाना लिमिटेड हुपरी, शुभम डायनिंग इचलकरंजी, शरद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी यड्राव, डी एम कस्तुरे चॅरिटेबल फौंडेशन इचलकरंजी, गुरुकुल शिक्षण समूह अ.लाट इचलकरंजी, लक्ष्मीदत्त मंडप प्रा. लिमिटेड इचलकरंजी, बालमुकुंद रामाकिसन चॅरिटेबल ट्रस्ट इचलकरंजी, दि लक्ष्मी को- ऑप. प्रोसेसर्स इचलकरंजी, किरण गॅस एजन्सीज, चौगुले डेअरी प्रॉडक्ट्स आणि कल्लाप्पाण्णा आवाडे इचलकरंजी जनता सहकारी बँक यांचे सहकार्य लाभले आहे.
उदघाटनाच्या दिवशी सोमवार दिनांक १२ मे रोजी शिव – शंभू चरित्र अभ्यासक राहुल नलावडे (रायबा), पुणे यांचे छत्रपती शिवरायांचे नेतृत्व कौशल्य या विषयावर व्याख्यान होईल. मंगळवार १३ मे रोजी ग्राहक हक्क मार्गदर्शक व करिअर समुपदेशक विवेक वेलणकर, पुणे यांचे नागरिकहो सजग व्हा या विषयावर मार्गदर्शन होईल. बुधवार १४ मे रोजी प्रसिद्ध लेखक व मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. विजय पांढरीपांडे, हैदराबाद यांचे शिक्षण… कालचे, आजचे, उद्याचे या विषयावर व्याख्यान होणार आहे. गुरुवार १५ मे रोजी लेखक, संपादक, व्यंगचित्रकार व संगणक तज्ञ विवेक मेहत्रे, ठाणे यांचा, एका विलक्षण व्यक्तीचे अविश्वसनीय आयुष्य या विषयावर व्हिडिओ सादरीकरणासह सत्यकथेवर आधारित कार्यक्रम होणार आहे.
शुक्रवार दिनांक १६ मे रोजी प्रसिद्ध लेखक व अ. भा. मराठी साहित्य महामंडळाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी, नागपूर यांचे मराठीचा अभिजात दर्जा आणि मराठीसमोरील आव्हाने या विषयावर व्याख्यान होईल. शनिवार १७ मे रोजी सर्टिफाइड फॉरेन्सिक अकाउंटंट व फ्रॉड एक्झामिनर डॉ. अपूर्वा जोशी, पुणे यांचे आर्थिक गुन्हे व घोटाळे, सावधगिरी आणि उपाय या विषयावर व्याख्यान होणार आहे. रविवार १८ मे रोजी प्रसिद्ध संगीतकार कौशल इनामदार यांचा एका संगीतकाराची मुशाफिरी हा किस्से, कविता, कहाण्या आणि कवने यांचा कार्यक्रम होणार आहे. त्यांच्यासोबत सहकलाकार म्हणून अमेय ठाकूरदेसाई सहभागी होणार आहेत.
सोमवार दिनांक १९ मे रोजी प्रसिद्ध संशोधक व मराठी विज्ञान परिषदेचे माजी अध्यक्ष पद्मभूषण पुरस्कार प्राप्त डॉ. ज्येष्ठराज जोशी पुणे यांचे जागतिक तापमान वाढ आणि वातावरण बदलाचे परिणाम या विषयावर व्याख्यान होणार आहे. मंगळवार २० मे रोजी आर्थिक नियोजनकार व गुंतवणूक सल्लागार प्रियदर्शिनी मुळ्ये, रत्नागिरी यांचे उत्तम जगण्यासाठी आर्थिक नियोजन या विषयावर व्याख्यान होईल. समारोपाच्या दिवशी बुधवार दिनांक २१ मे रोजी काफिला कोल्हापूर या संस्थेचा वतीने जियारत ही मराठी, हिंदी, उर्दू, पंजाबी, कविता, किस्से आणि गाण्यांची मैफल होणार आहे. संकल्पना, लेखन व दिग्दर्शन सतीश तांदळे यांचे असून संगीत ऋषिकेश देशमाने यांचे आहे. त्यांच्यासोबत विविध गायक आणि वादक कलाकारांचा सहभाग या कार्यक्रमात आहे. सदरच्या सर्व व्याख्यानमालेसाठी प्रवेश विनामूल्य असून इचलकरंजी व परिसरातील नागरिकांनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800