राहुल आवाडे युवा सेनेची 3.11 लाखांची दहीहंडी शिरोळच्या जय महाराष्ट्र पथकाने फोडली
इचलकरंजी –
अखंड बरसणारा पाऊस, प्रचंड गर्दी, रॉक बँडच्या तालावर थिरकणारी तरुणाई आणि उत्साहाचा जल्लोष अशा वातावरणात पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी ठरलेली राहुल आवाडे युवा सेनेची 3 लाख 11 हजार रुपयांची दहीहंडी शिरोळच्या जय महाराष्ट्र पथकाने फोडली.
सोमवारी स्टेशन रोडवरील केएटीपी मैदानात पार पडलेल्या या सोहळ्यात अत्याधुनिक विद्युत रोषणाई, भव्य स्क्रीन, आकर्षक आतषबाजी आणि प्रथमच आयोजित केलेला रॉक बँड शो हे विशेष आकर्षण ठरले. महिलांची उपस्थितीही लक्षणीय होती.
स्पर्धेचा शुभारंभ माजी वस्त्रोद्योग मंत्री प्रकाश आवाडे, माजी आमदार सुरेश हाळवणकर व आमदार राहुल आवाडे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, श्रीकृष्ण प्रतिमा व दहीहंडी पूजन करून झाला. कोल्हापूर जिल्ह्यातील पाच गोविंदा पथकांनी या स्पर्धेत सहभाग घेतला. सुरुवातीला सर्व पथकांनी सहा थर रचून सलामी दिली. त्यानंतर चिठ्ठीद्वारे पथकांचा क्रम निश्चित करून दहीहंडी फोडण्याची शर्यत सुरू झाली.
सुरुवातीला गोडी विहीर पथकाने सहा थर रचून प्रयत्न केला, परंतु दहीहंडी 40 फुटांवर असल्याने ती दोन प्रयत्नांनंतर 31 फुटांवर खाली आणण्यात आली. त्यानंतर जय हनुमान पथकासह अन्य पथकांनीही प्रयत्न केले. अखेर जय महाराष्ट्र पथकातील ओंकार यादव या गोविंदाने सहा थर रचून दहीहंडी फोडत 3.11 लाखांचे बक्षिस पटकावले.
या सोहळ्याचे थेट प्रक्षेपण मोबाईलवर टिपण्यासाठी तरुणाईसोबतच लहानग्यांचीही उत्सुकता दिसून आली. प्रथमच झालेल्या रॉक बँड शोने स्पर्धेत रंगत आणली. सूत्रसंचालन प्रा. युवराज मोहिते यांनी केले.
या वेळी मोश्मी आवाडे, दिया आवाडे, राजू बोंद्रे, सतिश मुळीक, नितेश पोवार, दिपक सुर्वे, इम्रान मकानदार, नाना पाटील, शेखर शहा, श्रीरंग खवरे, बाळासाहेब माने, प्रकाश दत्तवाडे, बाबासो चौगुले, तानाजी पोवार, बाळासाहेब कलागते, पै. अमृत भोसले, वृषभ जैन, महेश पाटील, धनंजय टारे, चंद्रकांत पाटील, बाळकृष्ण तोतला, अरविंद शर्मा, प्रसाद खोबरे यांच्यासह विविध सहकारी संस्थांचे पदाधिकारी, ग्रामीण भागातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800








