शहापूर बाजार वगळूनच आरटीओ कार्यालय उभारणार : आमदार डॉ. राहुल आवाडे, स्थानिकांची सह्याची मोहीम सुरू.
इचलकरंजी, –
शहापूर परिसरात आरटीओ कार्यालय उभारणीबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत आठवडा बाजार, विनायका शाळा, कुस्ती मैदान, यात्रा भरण्याची जागा व बिरदेव मंदिर परिसर या ठिकाणी कोणतीही उभारणी होणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले. यासाठी इतर उपलब्ध जागांची मोजणी करून कार्यालय उभारणीस गती देण्याचे आदेश देण्यात आले.
या बैठकीस आमदार डॉ. राहुल आवाडे, जिल्हाधिकारी अमोल येडगे, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी इंगवले, प्रांताधिकारी दीपक शिंदे यांच्यासह लोकप्रतिनिधी व विभागीय अधिकारी उपस्थित होते.
आमदार डॉ. आवाडे म्हणाले, “शहापूरचा आठवडा बाजार सध्याच्याच ठिकाणी कायम राहील. आरटीओ कार्यालयामुळे नागरिकांना सर्व शासकीय सेवा स्थानिक पातळीवरच सुलभ व जलद गतीने मिळतील. त्यामुळे वेळ व खर्चाची बचत होऊन सुविधा अधिक चांगल्या पद्धतीने उपलब्ध होतील.”
तथापि, शासन नियमांनुसार आरटीओ कार्यालयासाठी किमान १२ एकर जागा आवश्यक आहे. परंतु साडेपाच एकरामध्येच प्रकल्प राबवण्याचा प्रयत्न सुरू असल्याने ग्रामस्थांचा विरोध कायम राहील, असा इशारा माजी नगरसेवक उदयसिंह पाटील यांनी दिला. “शहापूरमधील आरटीओ कार्यालयाचा प्रस्ताव रद्द होईपर्यंत ग्रामस्थांचा लढा सुरूच राहील,” असे ते म्हणाले.
महिलांचा ठाम विरोध – बाजार हलवू देणार नाही
दरम्यान, शहापूर बाजारपेठेत आरटीओ कार्यालयाच्या विरोधात सोमवारी नागरिकांनी सह्यांची मोहीम राबवली. यामध्ये तब्बल दोन हजारांहून अधिक ग्रामस्थांनी सहभाग घेतला. बाजारात खरेदीसाठी आलेल्या महिलांनीही संतप्त भूमिका घेत, “गेल्या अनेक वर्षांपासून शहापूरमध्येच बाजार भरतो, तो हलवू देणार नाही,” असा ठाम इशारा दिला.
या वेळी माजी नगरसेवक उदयसिंह पाटील, नितीन कोकणे, रतन वाजे, दिलीप पाटील, डॉ. बी. एम. आरगे, सचिन राणे यांच्यासह विरोधी समितीचे सदस्य उपस्थित होते.
शहापूर आरटीओ ऑफिस प्रश्नावर बैठकीस उपस्थित आ.राहुल आवाडे,जिल्हाधिकारी अमोल येडगे,आरटीओचे इंगवले व इतर
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







