पुणे पदवीधर-शिक्षक मतदारसंघात मतदार नोंदणीस सुरवात
इचलकरंजी:
पुणे पदवीधर-शिक्षक विधानसभा मतदारसंघाच्या मतदार याद्यांच्या पुनर्रचना कार्यक्रमास प्रारंभ झाल्याची माहिती उपविभागीय अधिकारी तथा मतदार नोंदणी अधिकारी दीपक शिंदे याांनी दिली.
मा. मतदार नोंदणी अधिकारी, पुणे पदवीधर-शिक्षक मतदारसंघ तथा विभागीय आयुक्त पुणे यांच्या सूचनांनुसार विविध कामांचा कार्यक्रम आखण्यात आला आहे. त्यानुसार नियुक्त अधिकाऱ्यांनी संबंधित ठिकाणी माहितीफलक (बोर्ड) लावणे, शासकीय कार्यालये, महाविद्यालये आणि शैक्षणिक संस्थांमध्ये मतदार नोंदणीबाबत पत्र देऊन जनजागृती करणे व बैठका आयोजित कराव्यात, असे निर्देश देण्यात आले आहेत.
दिनांक ३० सप्टेंबर २०२५ ते ६ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत मतदार नोंदणी अर्ज स्वीकृतीसाठी मुदत निश्चित करण्यात आली आहे. पदवीधर मतदार अर्ज करताना अर्जदाराने १ नोव्हेंबर २०२५ पूर्वी किमान तीन वर्षे म्हणजेच १ नोव्हेंबर २०२२ पूर्वी पदवीधर असणे आवश्यक आहे. तर शिक्षक मतदारांच्या बाबतीत १ नोव्हेंबर २०२५ पूर्वी किमान सहा वर्षांचा अध्यापनाचा अनुभव असावा, त्यापैकी किमान तीन वर्षे १ नोव्हेंबर २०२२ पूर्वी पूर्ण असावीत, अशी अट आहे.
सर्व अर्जांबरोबर आधारकार्डची छायांकित प्रत अनिवार्य असून, पदवीधर आणि शिक्षक मतदारांची स्वतंत्र नोंदवही ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच कोणतेही अर्ज गठ्ठ्याने स्वीकारले जाणार नाहीत, अशीही सूचना करण्यात आली आहे.
प्राप्त अर्जांची पात्रता/अपात्रता तपासणी दररोज करण्यात येणार असून, त्याची आकडेवारी जिल्हाधिकारी कार्यालय व मतदार नोंदणी अधिकारी कार्यालयास कळविण्यात येणार आहे.
या पुनर्रचना उपक्रमामुळे मतदार यादी अधिक अद्ययावत आणि अचूक होण्यास मदत होणार असल्याचे उपविभागीय अधिकारी शिंदे यांनी सांगितले.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







