इचलकरंजीच्या ऐतिहासिक अनुबाई कन्या शाळा वास्तूला नवी झळाळी — शिष्यसंवर्धनी प्रतिष्ठानतर्फे महिलांसाठी व विद्यार्थ्यांसाठी उपक्रम सुरू होणार
इचलकरंजी:
इचलकरंजीच्या ऐतिहासिक अनुबाई कन्या शाळा वास्तूला पुन्हा एकदा नवजीवन मिळणार आहे. समाजहितासाठी कार्यरत असलेल्या शिष्यसंवर्धनी प्रतिष्ठान या संस्थेला ही वास्तू भाडेतत्त्वावर उपलब्ध झाली असून, या ठिकाणी महिलांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी विविध सामाजिक व शैक्षणिक प्रकल्प सुरू करण्यात येणार आहेत.
संस्थेच्या प्रमुख सौ. रमा फाटक यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोल्हापूर जिल्ह्यातील आंबा, मलकापूरसारख्या दुर्गम भागात काम करणाऱ्या या संस्थेला आता इचलकरंजीत नवे कार्यक्षेत्र लाभले आहे. या निर्णयासाठी राज्यसभा खासदार डॉ. मेधा कुलकर्णी, माजी आमदार सुरेश हाळवणकर, माजी वस्त्रोद्योग मंत्री प्रकाश आवाडे, तसेच आमदार राहुल आवाडे यांनी विशेष प्रयत्न केले. इचलकरंजी महापालिकेचे तत्कालीन आयुक्त ओमप्रकाश दिवटे, सध्याच्या आयुक्त पल्लवी पाटील, सहाय्यक आयुक्त विजय राजापुरे व मिळकत विभागाचे श्रीकांत पाटील यांनीही मोलाची भूमिका बजावली.
राणीसाहेब अनुबाई घोरपडे यांच्या प्रेरणादायी जीवनावर आधारित “Regent Queen of Ichalkaranji – अनुबाईसाहेब घोरपडे” या चरित्रग्रंथाचे लेखन इतिहास अभ्यासिका व पेशवा घराण्याच्या दहाव्या वंशज मोहिनी पेशवा करकरे यांनी केले आहे. या ग्रंथाचे प्रकाशन अलीकडेच पुण्यात खासदार मेधा कुलकर्णी यांच्या हस्ते झाले. त्यावेळी त्यांनी या वास्तूच्या पुनरुज्जीवनासाठी लागणारा निधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्याची ग्वाही दिली. तसेच लेखिका मोहिनी पेशवा करकरे पुढील महिन्यात इचलकरंजीला भेट देणार असल्याचेही सांगण्यात आले.
या वास्तूमध्ये शिष्यसंवर्धनी प्रतिष्ठान विविध सामाजिक आणि शैक्षणिक उपक्रम राबवणार आहे. त्यात ज्ञानप्रबोधिनीतर्फे शिबिरे, संस्कारवर्ग, संस्कृत वर्ग, महिलांसाठी व्यवसाय प्रशिक्षण केंद्र** सुरू करण्यात येणार असून महिलांना स्वावलंबी बनविण्याचा हेतू आहे. याशिवाय गरीब व वंचित विद्यार्थ्यांसाठी मोफत शिकवणी वर्ग सुरू केले जाणार आहेत.
सौ. रमा फाटक म्हणाल्या, “श्रीमंत अनुबाई यांच्या इच्छेनुसार इचलकरंजीतील महिला कर्तृत्ववान बनाव्यात, यासाठी ही संस्था काम करणार आहे. ज्ञानप्रबोधिनी व स्वरूपवर्धिनी या संस्थांच्या सहकार्याने उपक्रम लवकरच सुरू होणार आहेत. तसेच या ऐतिहासिक वास्तूमध्ये सुसज्ज ग्रंथालय सुरू करण्याचा मानस असून, यासाठी भाषा फाउंडेशनचे सहकार्य घेण्यात येणार आहे,” असेही त्यांनी सांगितले.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







