छत्रपतींचा इतिहास शालेय अभ्यासक्रमातुन घराघरात पोहचणार-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.इचलकरंजीत संभाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण
इचलकरंजी —
कॉ. के. एल. मलाबादे चौक, इचलकरंजी येथे स्वराज्यरक्षक,धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उत्साहात पार पडले. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी पुतळ्याला विनम्र अभिवादन केले.
धर्मवीर छत्रपती श्री. संभाजी महाराज प्रतिष्ठान स्मारक समितीच्या वतीने शासनाकडे करण्यात आलेल्या मागणीनुसार १.९१ कोटी रुपयांचे ‘शंभुतीर्थ’ स्मारकाचे काम अवघ्या साडेआठ महिन्यांत महानगरपालिकेकडून पूर्ण करण्यात आले. छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी लागणारी रक्कम स्मारक समितीने लोकवर्गणीतून उभी केली आहे.
“स्वराज्यरक्षक, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज… स्वराज्याचा स्वाभिमान” या घोषणेतून भाषणाची सुरुवात करताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, ‘देशधर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था, महापराक्रमी परमप्रतापी एक ही शंभू राजा था’ असे ज्यांच्याबद्दल गौरवोद्गार काढले, त्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण करण्याची संधी मिळणे हा माझ्यासाठी अभिमानाचा क्षण आहे. आजचा दिवस हिंदवी स्वराज्याला समर्पित आहे. इचलकरंजी शहरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचे तेज दिसते, त्यामुळे या शहराला भगवे शहर म्हणणे वावगे ठरणार नाही, असेही त्यांनी सांगितले.
सीबीएसई अभ्यासक्रमात हिंदवी स्वराज्याचा इतिहास समाविष्ट झाल्याबद्दल समाधान व्यक्त करत मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, हा केवळ पुतळा नसून तो आपला स्वाभिमान आहे. संभाजी महाराजांचा इतिहास अभ्यासक्रमात समाविष्ट झाल्याने घराघरात त्यांची यशोगाथा पोहोचण्यास मदत होईल.
कार्यक्रमास पालकमंत्री प्रकाश आबिटकर, मंत्री चंद्रकांत पाटील, खासदार धैर्यशील माने, खासदार धनंजय महाडिक,सुरेश हाळवणकर,संभाजी भिडे गुरुजी, स्मारक समितीचे अध्यक्ष गजानन महाजन, उपाध्यक्ष अरविंद माने, प्रसाद जाधव, युवराज बोने पाटील, मंगेश मस्कर यांच्यासह समितीचे सर्व सदस्य, स्थानिक लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
इचलकरंजीचा पाणीप्रश्न सोडवा-खा.धैर्यशील माने
दरम्यान, खासदार धैर्यशील माने यांनी इचलकरंजी शहराचा गंभीर पाणीप्रश्न तातडीने सोडवण्याची मागणी केली. यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी हा प्रश्न सोडवल्याशिवाय गप्प बसणार नाही, असे आश्वासन दिले. मात्र, ठोस घोषणा न झाल्याने शहरवासीयांचा भ्रमनिरास झाला.
शिवप्रेमींची तोबा गर्दी
छ. संभाजीमहाराज पुतळा लोकार्पण सोहळ्यासाठी अबालवृद्ध व नागरिकांनी तोबा गर्दी केली होती इचलकरंजी शहर भगवेमय झाले होते.
छ.संभाजी महाराज पुतळा अनावरण प्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,संभाजी भिडे गुरुजी,महाजन गुरुजी व लोकप्रतिनिधी व समिती सदस्य.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800









