ICHMH51NEWS.IN
9921600800

महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहितेची काटेकोर अंमलबजावणी

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहितेची काटेकोर अंमलबजावणी

इचलकरंजी —
इचलकरंजी महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने राज्य निवडणूक आयोगाने दि. १५ डिसेंबर २०२५ रोजी दिलेल्या आदेशानुसार आदर्श आचारसंहितेची प्रभावी व काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी सोमवारी आयुक्त तथा प्रशासक पल्लवी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महानगरपालिकेत सर्व विभागप्रमुखांची संयुक्त आढावा बैठक पार पडली. यावेळी आचारसंहितेच्या कालावधीत कोणत्याही प्रकारचा नियमभंग होणार नाही याची जबाबदारी प्रत्येक विभागप्रमुखाने घ्यावी, असे स्पष्ट निर्देश आयुक्तांनी दिले. शासकीय निधीतून किंवा महापालिकेच्या माध्यमातून कोणत्याही प्रकारची जाहिरात, उद्घाटन, भूमिपूजन, फलक, बॅनर, होर्डिंग तसेच डिजिटल प्रसिद्धी पूर्णतः बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले. शहरातील अनधिकृत फलक, बॅनर, पोस्टर व कटआऊट्सवर तातडीने कारवाई करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या असून राजकीय स्वरूपाच्या कार्यक्रमांना परवानगी देताना निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोर पालन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

महापालिकेच्या सर्व विभागांनी आपापल्या कार्यक्षेत्रात विशेष पथके स्थापन करून नियमित तपासणी करावी. आचारसंहितेचा भंग आढळल्यास संबंधितांवर तात्काळ कारवाई करून अहवाल सादर करावा, तसेच नागरिकांकडून येणाऱ्या तक्रारींवर तत्काळ दखल घेऊन त्यांचे त्वरित निराकरण करावे, असा आदेशही आयुक्तांनी दिला.

दरम्यान, आगामी इचलकरंजी महानगरपालिका निवडणुकीत एकूण ६५ नगरसेवक निवडून जाणार असून १६, १५, ४, १६ वा आणि ५ अशा प्रभागरचनेमुळे यंदाची निवडणूक अत्यंत चुरशीची होण्याची चिन्हे आहेत. निवडणूक कार्यक्रमानुसार उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया दि. २३ डिसेंबर २०२५ ते ३० डिसेंबर २०२५ या कालावधीत होणार असून अर्जांची छानणी दि. ३१ डिसेंबर २०२५ रोजी केली जाणार आहे. उमेदवारी माघार घेण्याची अंतिम तारीख दि. २ जानेवारी २०२६ असून चिन्ह वाटप दि. ३ जानेवारी २०२६ रोजी करण्यात येणार आहे. मतदान दि. १५ जानेवारी २०२६ रोजी होणार असून मतमोजणी दि. १६ जानेवारी २०२६ रोजी पार पडणार आहे.

या बैठकीस महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त, सर्व खातेप्रमुख, विभागप्रमुख व संबंधित अधिकारी उपस्थित होते. शहरात आदर्श आचारसंहितेचे पालन शिस्तबद्ध व पारदर्शक पद्धतीने होईल, यासाठी प्रशासन पूर्णतः सज्ज असल्याचा संदेश या बैठकीतून देण्यात आला.

बैठकीत आढावा घेताना आयुक्त पल्लवी पाटील

ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा