ICHMH51NEWS.IN
9921600800

समाजवादी व्यवस्था सर्वांगीण समतेच्या दिशेने जाते-डॉ वसंत भोसले

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

समाजवादी व्यवस्था सर्वांगीण समतेच्या दिशेने जाते-डॉ वसंत भोसले

इचलकरंजी:
प्रत्येक नागरिकाला स्वतःच्या विकासाची संधी देणारी व्यवस्था म्हणजे समाजवाद. मात्र समाजवाद व्यक्तिगत नसतो तर तो सामाजिक असतो. ती एक प्रकारे समूहाची राज्यसत्ता असते. भांडवलशाही व्यवस्था विषमतेची मोठी दरी निर्माण करते. तर समाजवादी व्यवस्था सर्वांगीण समतेच्या दिशेने नेणारी असते. त्यामुळे समाजवादी व्यवस्था कालही महत्त्वाची होती,आजही आहे आणि उद्याही असेल असे मत ज्येष्ठ पत्रकार डॉ.वसंत भोसले यांनी व्यक्त केले. ते समाजवादी प्रबोधिनीच्यावतीने ज्येष्ठ समाजवादी नेते पन्नालाल सुराणा व डॉ. बाबा आढाव यांना अभिवादनानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात ” समाजवाद : काल,आज आणि उद्या”विषयावर बोलत होते. प्रारंभी पन्नालाल सुराणा, डॉ.बाबा आढाव व भारताचे माजी गृहमंत्री शिवराज पाटील यांना आदरांजली वाहण्यात आली. शशांक बावचकर यांनी स्वागत केले. प्रसाद कुलकर्णी यांनी प्रास्ताविकातून या व्याख्यानाच्या आयोजनात मागील भूमिका मांडली.
डॉ.वसंत भोसले  म्हणाले, आजचा भवताल  समाजवादाच्या दिशेने वेगाने जाताना दिसत नाही. कारण भारतीय राज्यघटनेच्या तरतुदीनुसार सत्ता हस्तगत करून घटना विरोधी वर्तनव्यवहार मोठ्या प्रमाणात सुरू आहे. धर्म माणसांनी निर्माण केला तर आणि जात ही शोषण करणारी व्यवस्था आहे. त्यामुळे जातव्यवस्था आणि उच्चनीचता जोपर्यंत आहे तोपर्यंत समाजवादाची लढाई  दीर्घकाळ लढावी लागेल. धार्मिक उन्माद समाजाचे नुकसान करत असतो. तो शिक्षण, आरोग्य,रोजगार यासारखे महत्त्वाचे प्रश्न सोडवू शकत नाही. त्यामुळे आधुनिक समाज हा धर्मनिरपेक्षच असेल. तशी नवी समाज रचना होतानाही दिसत आहे.
डॉ.वसंत भोसले पुढे म्हणाले, भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान सभेतील अखेरचे भाषण प्रत्येकाने पाठ करावे असे आहे. तसेच छत्रपती शिवरायांचे राज्य खऱ्या अर्थाने रयतेचे राज्य होते ती धार्मिक लढाई नव्हती हेही समजून घेतले पाहिजे. डॉ.भोसले यांनी आपल्या व्याख्यानामध्ये राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय वर्तमान परिस्थिती, भारतीय दर्शन परंपरा, भारतीय स्वातंत्र्यलढा, राज्यघटनेची मूल्ये, भारतापुढे आज उभे राहिलेले प्रश्न याची अनेक उदाहरणे देत समाजवादी विचाराची गरज अधोरेखित केली. शेवटी अन्वर पटेल यांनी आभार मानले.

समाजवाद काल आज आणि उद्या या विषयावर बोलताना डॉ वसंत भोसले व्यासपीठावर प्रसाद कुलकर्णी, शशांक बावचकर

ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा