इचलकरंजीत शिवशाहू विकास आघाडीच्या उमेदवारांच्या अर्ज दाखलासाठी भव्य पदयात्रा
इचलकरंजी :
इचलकरंजी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवशाहू आघाडीच्या उमेदवारांनी अर्ज दाखल करण्यापूर्वी शिवतीर्थ ते शंभुतीर्थ दरम्यान भव्य पदयात्रा काढण्यात आली. या पदयात्रेत आ.सतेज पाटील,माजी मंत्री बाळासाहेब पाटील यांच्यासह विविध मान्यवर व कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त सहभाग होता. शिवतीर्थावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून उमेदवारांनी अर्ज दाखल केले.
यावेळी माजी आमदार राजीव किसनराव आवळे, राजूबाबा आवळे, शशांक बावचकर, मदन कारंडे, संजय कांबळे, राहुल खंजिरे, सागर चाळके, माजी नगराध्यक्षा मेघाताई चाळके, प्रकाश मोरबळे, संभाजीराव नाईक, उदयसिंह पाटील यांच्यासह शिवशाहू आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शहराच्या विकासाला गती देण्यासाठी शिवशाहू आघाडी हा सक्षम पर्याय असल्याचे नेत्यांनी यावेळी सांगितले. इचलकरंजीतील पाणीटंचाई, हातमाग क्षेत्रातील कामगार-व्यापारी यांचे प्रश्न, सामान्य कष्टकरी व झोपडपट्टी परिसरातील नागरिकांच्या अडचणी ही आघाडीची प्राथमिकता असेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
“पाणी व विजेचे प्रश्न मार्गी लावू; गेल्या पाच वर्षांत सत्ताधाऱ्यांनी काहीच केले नाही,” अशी टीका यावेळी करण्यात आली. मूळ भाजपची अवस्था जनतेसमोर उघडी पडली असून माजी आमदार सुरेश हाळवणकर यांच्याकडे बघितल्यावर ते समजते असा टोला ही सतेज पाटील यांनी लगावला. इचलकरंजी शहराला शिवशाहू विकास आघाडी हाच खरा पर्याय असल्याचे आमदार सतेज पाटील म्हणाले.
पदयात्रेदरम्यान शंभूतीर्थ येथे अभिवादन करताना आ.सतेज पाटील व शिव शाहू विकास आघाडीचे पदाधिकारी
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







