ICHMH51NEWS.IN
9921600800

अंगारकी संकष्टी निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

अंगारकी संकष्टी निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

इचलकरंजी:
इचलकरंजी शहरातील पंचगंगा नदीकिनारी असलेल्या श्री पंचगंगा वरद विनायक भक्त मंडळाच्या वतीने अंगारकी संकष्टी चतुर्थी निमित्ताने मंगळवार, दि. ६ जानेवारी २०२६ रोजी भव्य धार्मिक, सांस्कृतिक व सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने वरद विनायक मंदिर व संपूर्ण परिसर भक्तीमय व उत्सवमय वातावरणात न्हालेला आहे.
मंदिरामध्ये पाना-फुलांच्या माळा, आकर्षक रांगोळी सजावट करण्यात आली असून, मंदिर परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई लावण्यात आली आहे. या देखण्या सजावटीमुळे भाविकांचे लक्ष वेधले जात असून सायंकाळी मंदिर परिसर अधिकच मनमोहक दिसणार आहे.
कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ८ वाजता नित्य आरतीने होणार आहे. त्यानंतर सकाळी १० वाजल्यापासून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले असून, हे शिबिर कै. बाळासाहेब दाते लायन्स ब्लड बँक, इचलकरंजी यांच्या सौजन्याने पार पडणार आहे. समाजोपयोगी उपक्रम म्हणून या रक्तदान शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
सकाळी १०.३० वाजता युवा कलाकार अथर्व गणमुखे व पवन कुलकर्णी यांच्या सादरीकरणातून भावगीत, भक्तिसंगीत व भजन-गीतांचा बहारदार कार्यक्रम होणार असून, या कार्यक्रमामुळे सकाळच्या सत्राला भक्तिरसाची विशेष रंगत येणार आहे.
सकाळी ११ वाजल्यापासून भाविकांसाठी शाबूदाण्याच्या खिचडीचा महाप्रसाद वाटप करण्यात येणार आहे. सायंकाळी ४ ते ६ वाजता श्री महालक्ष्मी महिला भजनी मंडळ, इचलकरंजी यांचे भक्तीमय भजन, तर सायं. ६ ते ८ वाजता अमृतधारा गीत मंच, हुबळी यांचा भक्तिगीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
सायंकाळी ७ वाजता नित्य आरती, तर रात्री ९.१५ वाजता संकष्टी चंद्रोदय महाआरती संपन्न होणार आहे. दिवसभर चालणाऱ्या या कार्यक्रमांमुळे मंदिर परिसर भक्ती, संगीत, सेवा व सामाजिक बांधिलकीच्या भावनेने भारावून जाणार आहे.
या पावन अंगारकी संकष्टीच्या निमित्ताने सर्व भाविकांनी व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सर्व धार्मिक, सांस्कृतिक व सामाजिक कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री अशोक स्वामी (अध्यक्ष) तसेच श्री पंचगंगा वरद विनायक भक्त मंडळ, इचलकरंजी यांच्या वतीने करण्यात आले आहे.
ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा