इचलकरंजी महानगरपालिका निवडणुकीसाठी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त
३ पोलीस ठाणे हद्दीत ३०२ मतदान केंद्रांवर व्यापक सुरक्षा व्यवस्था
इचलकरंजी :
इचलकरंजी महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५–२६ च्या पार्श्वभूमीवर शहरात शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून कडेकोट बंदोबस्ताची तयारी करण्यात आली आहे. शिवाजीनगर, इचलकरंजी व शहापूर या तीन पोलीस ठाण्यांच्या हद्दीत ही निवडणूक प्रक्रिया पार पडणार असून, त्यासाठी सर्वंकष सुरक्षा नियोजन राबविण्यात आले आहे.
या निवडणुकीसाठी एकूण ३०२ मतदान केंद्रे असून ती ७८ इमारतींमध्ये आहेत. संपूर्ण क्षेत्रात १२ पोलीस सेक्टर पेट्रोलिंग पथके तैनात करण्यात आली आहेत. तसेच स्ट्राँगरूमच्या सुरक्षेसाठी १+३ बंदोबस्तासह एसआरपीएफची १ प्लाटून तैनात करण्यात आली आहे.
निवडणूक काळात गैरप्रकार रोखण्यासाठी ४ एसएसटी (स्टॅटिक सर्व्हेलन्स टीम) व ४ एफएसटी (फ्लाइंग स्क्वॉड टीम) कार्यरत ठेवण्यात आल्या आहेत. संभाव्य गर्दी होणाऱ्या मतदान केंद्रांना पोलीस अधिकारी व अंमलदारांनी प्रत्यक्ष भेटी देऊन पाहणी केली आहे.
निवडणूक अनुषंगाने एकूण १८ पोलीस अधिकारी, २९७ पोलीस अंमलदार व ४०० होमगार्ड यांचे मनुष्यबळ वापरण्यात येणार आहे. आतापर्यंत प्रतिबंधक कारवाई अंतर्गत बीएनएसएस कलम १२६ प्रमाणे ११६ केसेस, कलम १२९ प्रमाणे २७ केसेस दाखल करण्यात आल्या आहेत. तसेच बीएनएसएस १६३(२) प्रमाणे १५७ व्यक्तींना हद्दपार करण्यासाठी प्रस्ताव सादर करण्यात आले आहेत.
बीएनएसएस कलम १६८ अंतर्गत १५५ व्यक्तींना नोटिसा बजावण्यात आल्या असून, मुंबई दारूबंदी कायदा कलम ९३ अंतर्गत २० कारवाया करण्यात आल्या आहेत. याशिवाय ८२ एनबी डब्ल्यू वॉरंटची अंमलबजावणी करण्यात आली आहे.
रेकॉर्डवरील गुन्हेगार, उपद्रवी व शांतता भंग करणाऱ्या इसमांवर तसेच अवैध धंदे करणाऱ्यांवर लक्ष ठेवण्यासाठी विशेष पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. दारूबंदी अंतर्गत २९ केसेसमध्ये सुमारे ६९ हजार ७३५ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तसेच हद्दीतील सर्व शस्त्र परवाना धारकांकडील शस्त्रे जमा करून घेण्यात आली आहेत.
इचलकरंजी महानगरपालिका निवडणूक शांततामय व निर्भय वातावरणात पार पडावी, यासाठी पोलीस प्रशासन सज्ज असल्याची माहिती शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या वतीने देण्यात आली आहे.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







