ICHMH51NEWS.IN
9921600800

सर्क्युलर इकॉनॉमीतील बायो-सीएनजीसमोर साठवण व आर्थिक व्यवहार्यतेचे मोठे प्रश्न – प्रकाश आवाडे

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

सर्क्युलर इकॉनॉमीतील बायो-सीएनजीसमोर साठवण व आर्थिक व्यवहार्यतेचे मोठे प्रश्न – प्रकाश आवाडे

इचलकरंजी –
सर्क्युलर इकॉनॉमीच्या दिशेने वाटचाल करताना बायो-सीएनजी हा साखर उद्योग आणि देशाच्या ऊर्जा सुरक्षिततेसाठी महत्त्वाचा पर्याय ठरू शकतो. मात्र बायो-सीएनजी प्रकल्प हा साखर कारखाना सुरू असेपर्यंतच कार्यक्षम राहतो. त्यानंतर उर्वरित काळात उत्पादन, साठवणूक आणि आर्थिक भार कसा पेलायचा, याची स्पष्ट उत्तरे शोधण्याची गरज असल्याचे प्रतिपादन कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे ज्येष्ठ संचालक तथा माजी वस्त्रोद्योग मंत्री प्रकाश आवाडे यांनी केले.
कोल्हापूर येथे दि शुगर टेक्नॉलॉजिस्टस् असोसिएशन ऑफ इंडिया, नवी दिल्ली यांच्या वतीने आयोजित ‘सर्क्युलर इकॉनॉमीमधील बायो-सीएनजी : आव्हाने आणि पुढील वाटचाल’ या विषयावरील चर्चासत्रात ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. साखर कारखान्यांमधून निर्माण होणाऱ्या उपउत्पादनांचा बायो-सीएनजी निर्मितीसाठी प्रभावी वापर कसा करता येईल, यावर तज्ज्ञांनी मते मांडली.
माजी मंत्री आवाडे यांनी मोठा भांडवली खर्च, तंत्रज्ञानाची उपलब्धता, कच्च्या मालाचा सातत्यपूर्ण पुरवठा, धोरणात्मक अडथळे आणि बाजारपेठेतील मर्यादा यांचा उल्लेख केला. साखर कारखाने पूर्वी सुमारे १८० दिवस चालत असत; आज ती मुदत सुमारे १०० दिवसांपर्यंत मर्यादित झाली आहे. त्यामुळे बायो-सीएनजी प्रकल्प उर्वरित २६५ दिवस निष्क्रिय राहतो, मात्र कर्जावरील व्याज भरावेच लागते. म्हणून अशा प्रकल्पांसाठी सरकारने बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी त्यांनी केली. अन्नधान्यासाठी गोदामांची तरतूद असते; मात्र बायो-सीएनजी साठवणुकीबाबत कोणती व्यवस्था आहे, हा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. बायो-सीएनजीकडे वाटचाल करताना सल्फरलेस उत्पादनावर भर देण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
कार्यकारी संचालक मनोहर जोशी यांनी बायो-सीएनजी हे स्वच्छ, पर्यावरणपूरक व शाश्वत इंधन असल्याचे सांगत प्रेसमड, मोलॅसिस व सेंद्रिय अवशेषांपासून अतिरिक्त उत्पन्नाची संधी निर्माण होऊ शकते, असे नमूद केले. शासनाच्या सुसंगत धोरणे, अनुदाने, खासगी गुंतवणूक व जनजागृतीची आवश्यकता त्यांनी अधोरेखित केली.
प्रारंभी दीपप्रज्वलन झाले. संस्थेचे अध्यक्ष संजय अवस्थी यांनी प्रास्ताविक केले. यावेळी विविध राज्यांतून आलेले साखर उद्योगातील तज्ज्ञ, संशोधक, तंत्रज्ञ व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दीपप्रज्वलन करताना माजी मंत्री प्रकाश आवाडे व पदाधिकारी

ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा