ICHMH51NEWS.IN
9921600800

इचलकरंजीतील तरुण कलाकार विपुल पोद्दार यांची पेन्सिलवरील सूक्ष्म कला जागतिक स्तराकडे

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

इचलकरंजीतील तरुण कलाकार विपुल पोद्दार यांची पेन्सिलवरील सूक्ष्म कला जागतिक स्तराकडे

इचलकरंजी:
वस्त्रोद्योग नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इचलकरंजी शहरातील तरुण कलाकार विपुल विनोदकुमार पोद्दार यांनी पेन्सिलच्या टोकावर सूक्ष्म कोरीव काम करून एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. एम.बी.ए. (वेलिंगकर इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट) शिक्षण घेतलेल्या विपुल यांना बारावीत असताना यूट्यूबवरील ‘Bobby Duke Arts’चा व्हिडिओ पाहून या कलेची प्रेरणा मिळाली. त्या व्हिडिओमध्ये पेन्सिलपासून तलवार कोरलेली पाहून त्यांनी २०१९ साली स्वतः प्रयत्न सुरू केले. सुरुवातीला तलवार बनवण्यात अपयश आले; मात्र ‘L’ अक्षर कोरून त्यांनी पहिली यशस्वी कलाकृती साकारली आणि त्यानंतर स्वतःचे नाव कोरत आत्मविश्वास वाढवत ही कला अधिक विकसित केली.
विपुल यांनी पेन्सिलवर स्वतःचे नाव, ‘LOVE’ अक्षर, खुर्ची, थॉरचा हातोडा, शिवलिंग (त्रिशूळ, कलश आणि कारंजासहित), गणपती बाप्पाची मूर्ती, हनुमानाची गदा, भारतीय ध्वजारोहण, दहीहंडी व बासरी तसेच राखी अशा विविध कलाकृती साकारल्या आहेत. प्रत्येक कलाकृतीसाठी लागणारा वेळ वेगवेगळा असतो. पूर्ण शिवलिंग सेट तयार करण्यासाठी एक दिवस लागला, तर गणपती मूर्ती साकारण्यासाठी तब्बल ११ दिवसांची मेहनत घ्यावी लागली.
विशेष म्हणजे ही कला त्यांनी कोणत्याही औपचारिक प्रशिक्षणाशिवाय स्व-अभ्यासातून आत्मसात केली आहे. जागतिक कीर्तीचे मायक्रो आर्टिस्ट Salavat Fidai आणि Daya Micro Art यांसारख्या कलाकारांकडून प्रेरणा घेत ते सातत्याने नवीन प्रयोग करत आहेत. सध्या हा त्यांचा छंद असला तरी भविष्यात ही कला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर नेऊन लिलावापर्यंत पोहोचवण्याचे त्यांचे ध्येय आहे. पुढील काळात बुद्ध मूर्ती, आयफेल टॉवर आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पेन्सिलवर साकारण्याची त्यांची महत्त्वाकांक्षा आहे.
त्यांच्या या प्रवासात श्री. अशोकजी पाटणी यांचे मोलाचे सहकार्य लाभत असून त्यांच्या माध्यमातूनच विपुल यांना वृत्तपत्रे, न्यूज चॅनेल आणि प्रेस कॉन्फरन्सद्वारे लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळत आहे. “ज्याप्रमाणे अशोकजींनी मला साथ दिली, त्याचप्रमाणे सर्वांच्या पाठिंब्याची आणि प्रेमाची गरज आहे. तुमची साथ लाभली तरच मी माझी ही कला जागतिक स्तरावर नेऊ शकेन,” अशी नम्र विनंती विपुल यांनी केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यापर्यंतही ही कला पोहोचावी, तसेच स्वातंत्र्यदिनी साकारलेल्या पेन्सिलवरील तिरंग्याचा गौरव व्हावा, अशी त्यांची इच्छा आहे. कुटुंबाचा पूर्ण पाठिंबा लाभलेल्या विपुल यांच्या या सूक्ष्म कलेची दखल आता व्यापक स्तरावर घेतली जावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

पेन्सिलीच्या टोकावर साकारलेली शिवलिंगाची प्रतिकृती

ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा