हुपरी येथे हिंदु राष्ट्र-जागृती सभा; ‘लव्ह जिहाद’ कायदा संमत करण्याची ११ हजार हिंदूंची मागणी
हुपरी
अर्थसंकल्पीय अधिवेशनात ‘लव्ह जिहाद’विरोधी कायदा तातडीने संमत करावा, स्वतंत्र पोलीस टास्क फोर्स स्थापन करावी व तक्रारींसाठी हेल्पलाईन सुरू करावी, अशी मागणी हुपरी येथील हुतात्मा स्मारक परिसरात आयोजित हिंदु राष्ट्र-जागृती सभेत करण्यात आली. आयोजकांच्या माहितीनुसार सभेस सुमारे ११ हजार हिंदू उपस्थित होते. महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. सामूहिक ‘वंदे मातरम्’ने सभेची सांगता झाली.
सभेला भाग्यनगर येथील श्रीराम युवा सेनेचे संस्थापक-अध्यक्ष आमदार टी. राजा सिंह प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते. त्यांनी ‘लव्ह जिहाद’ रोखण्यासाठी कठोर कायद्याची आवश्यकता अधोरेखित करत लोकसंख्या नियंत्रण कायदा लागू करण्याची मागणी केली. तसेच बांगलादेशी घुसखोरीविषयी सतर्क राहण्याचे आवाहन केले.
सनातन संस्थेच्या धर्मप्रचारक सद्गुरु स्वाती खाडये यांनी हिंदुत्वनिष्ठांवरील कथित दडपशाहीविरोधात संघटित होण्याचे आवाहन केले. “जात-पात-पक्ष-संप्रदाय विसरून एक हिंदू म्हणून एकत्र येणे आवश्यक आहे,” असे त्या म्हणाल्या. हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र व छत्तीसगड राज्य संघटक सुनील घनवट यांनी गावागावांत ‘ग्रामसुरक्षा दले’ स्थापन करण्याची सूचना केली आणि छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा उभारण्याबाबत प्रशासनाने समयमर्यादा जाहीर करावी, अशी मागणी केली.
सभेची सुरुवात शंखनाद व दीपप्रज्वलनाने झाली. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. सूत्रसंचालन श्री. चैतन्य तागडे यांनी केले. सभेदरम्यान स्वरक्षणाची प्रात्यक्षिके सादर करण्यात आली.
या सभेत ‘लँड जिहाद’सह विविध प्रश्नांवर कायदे करण्याची मागणी करण्यात आली. गांजा व अमली पदार्थ विक्रीविरोधात कठोर कारवाईची मागणी करण्यात आली. ‘छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ’ असा आदरयुक्त उल्लेख करावा, तसेच ‘वंदे मातरम्’ला विरोध करणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणीही करण्यात आली.
सभेला श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे श्री. गजानन महाजनगुरुजी, श्री. सुरेश यादव, ह.भ.प. विठ्ठलतात्या पाटील, नगरसेविका सौ. ऋतुजा गोंधळी, सौ. नंदीनी कौंदाडे, सौ. अलका नाईकवाडे, तसेच श्री. पंढरीनाथ ठाणेकर, श्री. संतोष हत्तीकर, श्री. दत्ता पाटील, श्री. नितीन काकडे, श्री. शरद माळी, श्री. रमेश भोरे, श्री. संजय पाटील, श्री. सुभाष गोटखिंडे, श्री. सतीश झांजगे, श्री. राजेश शेटे, श्री. दिनकर ससे, श्री. संभाजीराव भोकरे, श्री. राजू यादव, श्री. संभाजी (बंडा) साळुंखे, श्री. दिलीप भिवटे, श्री. ओम पवार, श्री. भगवंतराव जांभळे आदी उपस्थित होते.
या प्रसंगी ‘घरच्या घरी करता येतील असे होमिओपॅथी उपचार’ या ग्रंथासह ‘दत्त’ या ग्रंथाच्या मराठी व हिंदी ऑनलाईन आवृत्तीचे प्रकाशन करण्यात आले. तसेच ९ मार्च रोजी सकाळी ११ वाजता सुभाष चौक, हुपरी येथे ‘गांजा व ड्रग्ज’विरोधात आंदोलन करण्याचे आवाहन करण्यात आले.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







