सुतावर मिश्रीत घटकांचा स्पष्ट उल्लेख करा-पॉवरलूम असोसिएशनची यार्न मर्चंट असोसिएशनकडे मागणी
इचलकरंजी
गेल्या कांही महिन्यांपासून भेडसावत असणाऱ्या सूताच्या भेसळी संदर्भात यंत्रमागधारकांनी १००% कॉटन सूताची मागणी केल्यानंतर त्यांना १००% कॉटन सूताचा पुरवठा करणे. तसेच सूतामध्ये मिश्रीत घटक, त्याची टक्केवारीचा स्पष्ट उल्लेख, ज्या काऊंटचे सूत त्याच काऊंटचे बिल, ज्या मिलचे सूत त्या मिलच्या कोनावर त्याच काऊंटचे लेबल लावून बिले देण्यात यावी असे निवेदन दि इचलकरंजी पॉवरलुम असेसिएशनने यार्न मर्चंट असोसिएशनला दिलेले आहे.
गेल्या कांही महिन्यांपासून सुत गिरण्या, सूत व्यापाऱ्यांकडून कोणतीही पूर्व सूचना न देता विस्कोस व पाॅलिस्टर मिक्स सूत यंत्रमाग कारखानदारांना देणेत येत आहे. अशा प्रकारच्या सूतापासून बनविलेल्या कापडाची विक्री केल्यानंतर भेसळयुक्त सुताचा वापर केल्यामुळे कापडाची प्रक्रिया करताना मोठ्याप्रमाणात कन्टॅमनेशन येत आहे. यामुळे कांही कापड व्यापारी सेकंड क्वालिटीचे कापड म्हणून यंत्रमागधारकांचे पैसे कमी करीत आहेत. तर कांही व्यापारी कापड स्विकारतच नाहीत. यामुळे बऱ्याच यंत्रमागधारक व व्यापारी यांच्यामध्ये वादावादीचे प्रसंग निर्माण होत आहेत. यामुळे यंत्रमागधारकांचे मोठ्याप्रमाणात आर्थिक नुकसान होत आहे. अशा प्रकारच्या तक्रारी दि इचलकरंजी पॉवरलुम असोसिएशनकडे येत आहेत. या संदर्भात दि इचलकरंजी पॉवरलुम असोसिएशनने वेळोवेळी इचलकरंजी यार्न मर्चंट असोसिएशनला निवेदन दिलेले आहे. व पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधून सूत भेसळी संदर्भात चर्चाही केलेली आहे. त्याचबरोबर कांही सुतगिरण्यांबरोबरही चर्चा केलेली आहे. तसेच दि. २६ फेब्रुवारी २०२६ रोजी मा.टेक्सटाईल कमिशनर, मुंबई यांची प्रत्यक्ष भेट घेऊन सूताच्या भेसळी संदर्भात सविस्तर चर्चा करून याचे गांभिर्य त्यांच्या निदर्शनास आणून दिलेले आहे व निवेदनही दिलेले आहे. यावेळी मा.टेक्सटाईल कमिशनर यांनी यासंदर्भात यार्न मर्चंट असोसिएशनबरोबर मिटींग लावणेचे आश्वासन दिले होते. त्यासअनुसरून मा.टेक्सटाईल कमिशनर हे गुरूवार दि. १६ एप्रिल २०२६ रोजी रिजनल टेक्सटाईल कमिशनर ऑफिसचे अधिकारी, यार्न मर्चंट असोसिएशनचे सदस्य, दि इचलकरंजी पॉवरलुम असोसिएशनचे पदाधिकारी यांचेबरोबर मिटींग घेणार आहेत.
त्याचबरोबर आजअखेर ज्या कारखानदारांच्या कापडामध्ये भेसळीच्या सुतामुळे पट्टे आलेले आहेत. त्यासंदर्भात दि इचलकरंजी पॉवरलुम असोसिएशन हे कापड खरेदीदार अडत्या किंवा ट्रेडिंग चालक व कारखानदार यांच्यात समेट करून आणणेचे काम करीत आलेले आहे. खासकरून कारखानदारांचे पैसे कट करू नये याबाबत दि इचलकरंजी पॉवरलुम असोसिएशन प्रयत्न करीत आहे. ज्या सूत गिरण्यांमधून भेसळ युक्त सूत येत आहे अशा सूत गिरण्यांखी व त्यांच्या यार्न ट्रेडर्स यांच्याबरोबर यासंदर्भात चर्चा केलेली आहे आणि क्लेम देणेसंदर्भात सुचना केलेली आहे. येत्या कांही दिवसांत हा प्रश्न मार्गी लागेल अशी अपेक्षा असलेची माहिती दि इचलकरंजी पॉवरलुम असोसिएशनचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिलेली आहे.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







