सभागृहांची खालावत चाललेली प्रतिमा लोकशाहीला घातक…प्रबोधिनीच्या साप्ताहिक चर्चासत्रातील मत
इचलकरंजी:
संसद आणि विधिमंडळाच्या अधिवेशनांचा दिवसेंदिवस उडत चाललेला बोजवारा आणि लोकशाहीच्या या सर्वोच्च सभागृहांची खालावत चाललेली प्रतिमा हा अतिशय चिंताजनक प्रकार आहे.विरोधकांची सखोल चर्चेची तयारी नाही आणि सरकारला अधिवेशन गुंडाळण्याची घाई हे चांगले लक्षण नाही. म्हणूनच अधिवेशनाचा कालावधी वाढवणे, अधिवेशनात सविस्तर चर्चा घडवून आणणे हे सत्ताधारी आणि विरोधकांचेही कर्तव्य आहे असे मत
‘ सभागृहांची ढासळती प्रतिमा ‘ या विषयावर प्रबोधिनीच्या साप्ताहिक चर्चासत्रात व्यक्त करण्यात आले. या चर्चेत प्रसाद कुलकर्णी, शशांक बावचकर, तुकाराम अपराध,दयानंद लिपारे, पांडुरंग पिसे, शकील मुल्ला, सचिन पाटोळे, रामभाऊ ठिकणे, शहाजी धस्ते, मनोहर जोशी यांनी सहभाग घेतला.प्रारंभी ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार, उद्योजक विजयपत सिंघानिया, कामगार नेते शामराव कुलकर्णी यांना आदरांजली वाहण्यात आली.
या चर्चासत्रात असे मत व्यक्ती गेल्या वर्षात महाराष्ट्रात हिवाळी, पावसाळी व अर्थसंकल्पीय अशा तीन अधिवेशनात मिळून ४२ दिवस कामकाज झाले. संसदेचे तीन अधिवेशनात मिळून ६६ दिवस काम झाले. सभागृहात उपस्थितीही पूर्वीपेक्षा सरासरीने रोडावत चाललेली दिसते हे चिंताजनक आहे.जबाबदार लोकप्रतिनिधी आणि जनतेने कामकाजाच्या परिपूर्णतेबाबत व संसदीय बाबींबाबत सतर्क राहिले पाहिजे. कारण तसे झाले नाही तर हुकूमशाही सुप्त स्वरूपात लोकशाहीचे पांघरूण घेऊन वावरते.त्याचा भस्मासुर मोठा होऊ शकतो. लोकशाहीची प्रस्थापना प्राणपणाने व नेटाने करणे यातच आपल्या सार्वभौमत्वाचे हित आहे. संसदेचे कामकाज असो अथवा विधिमंडळाचे कामकाज असो ते पूर्ण क्षमतेने आणि सक्षमतेने चालवले पाहिजे. यासाठी जनतेनेही दबाव निर्माण केला पाहिजे.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







