इचलकरंजीत कचरा, रस्ते व खुदाई समस्यांवर नागरिक मंचचे निवेदन; महापालिकेकडून उपाययोजनांची ग्वाही
इचलकरंजी :
शहरातील कचरा व्यवस्थापन, रस्त्यांची दुरवस्था आणि अनियंत्रित खुदाई या प्रमुख समस्यांकडे लक्ष वेधत इचलकरंजी नागरिक मंचाच्या वतीने महापौर व उपमहापौरांना निवेदन देण्यात आले. स्वच्छ भारत योजनेअंतर्गत कचरा पॉईंट बंद करण्याचे धोरण राबविले जात असले तरी प्रत्यक्षात बंद केलेल्या ठिकाणांच्या शेजारीच पुन्हा कचरा साचत असल्याची बाब नागरिकांनी निदर्शनास आणली. सध्या शहरात फक्त ४३ घंटागाड्या कार्यरत असून, सुमारे ६० हजार मिळकतीचा कचरा संकलन कसे होत आहे, याबाबतही प्रश्न उपस्थित करण्यात आला.
महासत्ता चौक ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा या रस्त्याच्या प्रस्तावित कामासंदर्भातही नागरिक मंचाने सूचना केल्या. कृष्णा पाईपलाईनसह इतर भूमिगत वाहिन्यांमुळे वारंवार गळती होत असल्याने, सर्व चाचण्या पूर्ण करून व योग्य नियोजनानंतरच रस्त्याचे काम हाती घ्यावे, अन्यथा नव्याने झालेला रस्ता पुन्हा उकरावा लागण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली.
शहरात विविध कारणांमुळे सुरू असलेल्या रस्ते खुदाईच्या कामांमध्ये सुसूत्रतेचा अभाव असल्याची तक्रारही करण्यात आली. पाणी, ड्रेनेज, मोबाईल केबल, गॅस पाईपलाईन आदी कामांसाठी कुठे आणि कधी खुदाई होते याची माहिती नसल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. यासाठी स्वतंत्र वरिष्ठ अधिकारी नेमून सर्व विभागांमध्ये समन्वय साधावा, तसेच खुदाईनंतर एका आठवड्यात पॅचवर्क पूर्ण करण्याची सक्ती करावी, अशी मागणी करण्यात आली.
डेक्कन चौक सिग्नल ते गणेशनगर तिसरी गल्ली दरम्यान रस्त्याची अतिशय खराब अवस्था असून मोठमोठे खड्डे पडले आहेत. अरुंद रस्ता, वाढती वाहतूक आणि फेरीवाल्यांच्या अतिक्रमणामुळे वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत आहे. तसेच स्टेशन रोडवरील स्ट्रीट लाईट कामासाठी खोदलेल्या चरींमध्ये टाकलेला मुरूम रस्त्यावर पसरत असल्याने अपघाताचा धोका वाढला आहे. या पार्श्वभूमीवर संबंधित रस्त्यांचे तातडीने डांबरीकरण, अतिक्रमण हटविणे आणि चरींची योग्य दुरुस्ती करण्याची मागणी करण्यात आली.
दरम्यान, महापौर उदय धातूंडे यांनी कचरा व्यवस्थापनासाठी कार्यरत कंपनीचे काम असमाधानकारक असल्याचे मान्य करत लवकरच नवीन कंपनी नेमली जाईल, असे सांगितले. कचरा पॉईंटचा प्रश्नही लवकर मार्गी लावला जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. महासत्ता चौक ते आंबेडकर पुतळा रस्त्याचे काम सर्व तांत्रिक चाचण्या पूर्ण झाल्यानंतरच १५ मेनंतर सुरू करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
तसेच खुदाई व पॅचवर्क कामांवर नियंत्रण ठेवण्यासाठी कर्मचारी नियुक्त करण्यात आला असून, लवकरच वरिष्ठ अधिकाऱ्याची नियुक्ती करून कामांचे केंद्रीकरण केले जाईल. डेक्कन परिसरातील रस्ता काम पुढील दोन दिवसांत सुरू करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
यावेळी उपमहापौर अनिल डाळ्या, गटनेते विठ्ठल चोपडे, सचिन माळी, विनय महाजन उपस्थित होते. नागरिक मंचाच्या वतीने उमेश पाटील, अमित बियाणी, महेंद्र जाधव, जतीन पोतदार, राजू कोन्नुर, सुहास पाटील, लक्ष्मीकांत खंडेलवाल, सुषमा साळुंखे, अभिजित पटवा आदी उपस्थित होते.
महापौर उदय धातूंडे व उपमहापौर अनिल डाळ्या यांना विविध समस्यांचे निवेदन देताना इनाम सदस्य
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800






