ICHMH51NEWS.IN
9921600800

मावा कारवाया ‘हफ्ते’ वाढवण्यासाठीच का? इचलकरंजीत स्वस्त नशेखोरीवर कठोर लगामाची गरज

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

मावा कारवाया ‘हफ्ते’ वाढवण्यासाठीच का? इचलकरंजीत स्वस्त नशेखोरीवर कठोर लगामाची गरज

विशेष वृत्त- अभिजित पटवा

इचलकरंजी : 

शहरात मावा विक्रीचा अवैध व्यवसाय पुन्हा डोके वर काढत असून, यामुळे तरुण पिढी स्वस्तात नशेच्या आहारी जात असल्याची गंभीर स्थिती निर्माण झाली आहे. पोलीस प्रशासनाकडून वेळोवेळी कारवाया केल्या जात असल्या तरी त्या केवळ दिखाऊ ठरत असल्याची टीका नागरिकांतून होत आहे. काही दिवस कडक कारवाई आणि त्यानंतर अचानक शिथिलता, असा पॅटर्न सातत्याने दिसून येत असल्याने या कारवायांच्या उद्देशावरच संशय व्यक्त केला जात आहे.

यापूर्वी शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे प्रभारी म्हणून काम पाहताना अधिकारी दिलीप पवार यांनी मावा विक्रीविरोधात धडक मोहीम राबवली होती. त्यांनी संबंधितांवर बीएनएस कलम ३२८ अंतर्गत कठोर गुन्हे दाखल करून अनेक टपऱ्या व दुकाने बंद करण्यास भाग पाडले होते. त्या काळात मावा विक्रीला मोठ्या प्रमाणात आळा बसल्याचे चित्र होते. मात्र त्यानंतर परिस्थिती पुन्हा ढासळली. जिल्हा पोलीसप्रमुख योगेशकुमार यांच्या आदेशानुसार काही कारवाया झाल्या असल्या तरी, त्यात किरकोळ कलमे लावून आरोपींना सहज जामीन मिळेल अशी भूमिका घेतल्याचा आरोप होत आहे.

सध्या शिवाजीनगर आणि गावभाग पोलीस ठाण्यांच्या हद्दीत अनेक ठिकाणी उघडपणे मावा विक्री सुरू आहे. अवघ्या १० ते २० रुपयांत नशेची तल्लफ भागवणारा हा पदार्थ अल्पवयीनांनाही सहज उपलब्ध होत असल्याने पालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. या माव्यामध्ये नेमके कोणते रासायनिक किंवा घातक पदार्थ मिसळले जातात, याची अधिकृत पातळीवर तपासणी होणे अत्यंत आवश्यक असल्याची मागणी होत आहे.

अलीकडेच एका पोलीस ठाण्याच्या हद्दीत मावा विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली; मात्र दुसऱ्याच दिवशी ती पूर्णपणे थंडावल्याचे दिसून आले. त्यामुळे “कारवाई हफ्ते न दिल्यामुळे झाली का, की हफ्ते वाढवण्यासाठी?” असा थेट सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. या चर्चांमुळे पोलीस यंत्रणेच्या विश्वासार्हतेवर परिणाम होत असल्याचेही जाणवते.

दरम्यान, शहरात ‘फ्रेंचायसी मॉडेल’वर मावा विक्रीचे जाळे उभे राहिल्याची धक्कादायक बाब असून पूर्वी कारवाई झालेल्या एकसारख्या नावाखाली एकसारख्या पद्धतीने टपऱ्या उभ्या करून वितरण साखळी निर्माण करण्यात आली आहे. या साखळीला राजकीय वरदहस्त मिळत असल्याच्या चर्चाही रंगत असून, त्यामुळे कारवाईला खीळ बसत असल्याचा आरोप आहे.

अवैध व्यवसायाविरोधात काम करणाऱ्या काही प्रामाणिक पोलीस कर्मचाऱ्यांना अंतर्गत पातळीवरच अडथळे निर्माण करून खच्चीकरण केले जात असल्याचाही गंभीर आरोप पुढे येत आहे. खोट्या तक्रारी, बदलीची भीती किंवा दबावाच्या माध्यमातून अशा कर्मचाऱ्यांचे मनोबल खच्ची केले जाते आणि परिणामी अवैध व्यवसायाची साखळी अखंडित सुरू राहते, असे स्थानिकांचे म्हणणे आहे.

विशेष म्हणजे, इचलकरंजीतील अवैध धंद्यांवर अनेकदा कोल्हापूरहून विशेष पथके येऊन कारवाया करतात. मात्र स्थानिक पोलीस कर्मचारी त्याच तीव्रतेने सातत्यपूर्ण कारवाई का करत नाहीत, हा प्रश्न अनुत्तरित आहे. स्थानिक पातळीवर प्रभावी नियंत्रण यंत्रणा उभी राहणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त होत आहे.

शिवाजीनगर पोलिस ठाण्यात सध्या कार्यरत प्रभारी व एका वसुली बहाद्दर कर्मचारी यांची पूर्वीच्या एकाच ठिकाणी काम केल्याचा अनुभव वसुलीसाठी उपयोगी ठरत असल्याच्या उघड चर्चा आहेत.

एकूणच, इचलकरंजी शहरात मावा विक्रीच्या माध्यमातून स्वस्त नशेखोरीचे जाळे अधिकच घट्ट होत चालले आहे. यावर केवळ अधूनमधून कारवाई न करता सातत्यपूर्ण, कठोर आणि पारदर्शक मोहीम राबवणे अत्यावश्यक आहे. अन्यथा येणाऱ्या काळात याचे गंभीर सामाजिक परिणाम भोगावे लागतील, अशी भीती नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.

ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा