पानसरे यांच्या ‘शिवाजी कोण होता?’ पुस्तकावर समाजवादी प्रबोधिनीमध्ये चर्चासत्र
इचलकरंजी :
समाजवादी प्रबोधिनीच्या वतीने आयोजित साप्ताहिक चर्चासत्रात शहीद कॉ. गोविंद पानसरे लिखित ‘शिवाजी कोण होता?’ या पुस्तकावर सखोल चर्चा करण्यात आली. या चर्चेत छत्रपती शिवाजी महाराजांचे व्यक्तिमत्त्व आणि कार्यकर्तृत्व पानसरे यांनी अभ्यासपूर्ण पद्धतीने मांडले असल्याचे वक्त्यांनी अधोरेखित केले.
या पुस्तकातील विचार काहींना खटकत असले तरी त्याच्या आशयावर ठोस आक्षेप घेता येत नाही, असे मत व्यक्त करत समाजाची दिशाभूल करण्यासाठी मुद्दाम वेगवेगळे वाद निर्माण केले जात असल्याची टीका करण्यात आली. सध्याच्या घडामोडींनाही याच पार्श्वभूमीवर पाहण्याची गरज असल्याचे सांगण्यात आले.
चर्चासत्रात ‘पानसरे यांनी सांगितलेले शिवराय’ या विषयावर प्रसाद कुलकर्णी, शशांक बावचकर, प्रा. रमेश लवटे, पांडुरंग पिसे, अशोक केसरकर, दयानंद लिपारे, देवदत्त कुंभार, शकील मुल्ला, नारायण लोटके, शहाजी धस्ते, मनोहर जोशी, अशोक माने आदींनी आपले विचार मांडले. पानसरे यांनी या पुस्तकातून शिवाजी महाराजांचे राज्यकारभार, सामाजिक रचना, धर्मनिरपेक्ष भूमिका, तसेच इतिहासाचा विपर्यास यांसारख्या विविध मुद्द्यांवर प्रकाश टाकला असल्याचे वक्त्यांनी नमूद केले.
तसेच बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी पुस्तकाच्या संदर्भात केलेल्या वक्तव्यांचा व कथित धमकीचा तीव्र निषेध करण्यात आला. ही बाब अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला असल्याचे सांगत संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी करण्यात आली. शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या बागेश्वर बाबांचाही यावेळी निषेध करण्यात आला.
समारोपात, छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आजही मार्गदर्शक असून केवळ प्रतिमापूजन न करता त्यांच्या विचारांचे आचरण करणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त करण्यात आले. तसेच जयजयकाराच्या गदारोळात विचारांचा विसर पडू नये, असे आवाहन करण्यात आले.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800




