तारदाळात ‘खंडणी गँग’चा हैदोस; कामासाठी महिन्याला ३० हजारांची मागणी, जिवे मारण्याच्या धमक्या
इचलकरंजी:
हातकणंगले तालुक्यातील तारदाळ परिसरात खंडणीखोरांचा उघड सुळसुळाट झाल्याचे धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. मेंडिंग काम करू द्यायचे असेल तर महिन्याला ३० हजार रुपये द्या, अन्यथा जिवे ठार मारू, अशी थेट धमकी देत तरुण उद्योजकाला लक्ष करण्यात आले आहे. या प्रकरणी शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
याबाबत सम्राट अशोक घोरपडे (वय २९, रा. संगमनगर, तारदाळ) यांनी फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून सुरज शिर्के, सुजर गायकवाड, व्यंकटेश पी.व्ही., अमोल माळी आणि त्यांच्या दोन अनोळखी साथीदारांविरुद्ध गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी घोरपडे हे आरसीएम ग्रुपच्या कापड कारखान्यात ‘मेंडींग’चे काम करतात. आरोपींनी त्यांना लक्ष करत आधी फोनवरून धमक्या देण्यास सुरुवात केली. त्यानंतर १३ एप्रिल रोजी दुपारी सन्मती हायस्कूलजवळ त्यांच्या मोटारसायकलला अडवून उघडपणे दमदाटी करण्यात आली. “काम करायचे असेल तर महिन्याला ३० हजार रुपये द्यावे लागतील, नाहीतर जिवे मारू,” अशी थेट धमकी देत आरोपींनी खंडणीची मागणी केली.
इतक्यावरच न थांबता आरोपींनी २५ एप्रिल रोजी आरसीएम ग्रुपच्या कारखान्यात घुसखोरी करत कामगारांनाही धमकावले. फिर्यादीचा कामगार अभीअली मुजावर याला दम देत सुरू असलेले मेंडींगचे काम बंद पाडण्यात आले. या सर्व प्रकारामुळे परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
धक्कादायक बाब म्हणजे, हे सर्व प्रकार दिवसाढवळ्या घडत असताना आरोपींचा बेधडकपणा स्पष्टपणे दिसून येत आहे. स्थानिक पातळीवर खंडणीसाठी संघटित टोळ्या सक्रिय झाल्याचे संकेत या घटनेतून मिळत आहेत. उद्योग-धंदे करणाऱ्यांना लक्ष्य करून अशा प्रकारे खंडणी उकळण्याचा प्रकार वाढत असल्यास गंभीर परिणाम होण्याची भीती व्यक्त होत आहे.
या प्रकरणी पोलीस हवालदार कांबळे यांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कुटे करत आहेत. मात्र, वाढत्या खंडणी प्रकरणांवर पोलिसांनी तातडीने कडक कारवाई करून या टोळ्यांना आळा घालावा, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे.
राजकीय हस्तक्षेप झुगारून मोक्का कारवाईची गरज
यामधील आरोपी रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत ते सुटून आले किंवा जामिनावर बाहेर आले तर कोणत्यातरी राजकीय आश्रयाला जातात व पुढे आपल्यावरील कारवाया टाळण्याचा प्रयत्न करतात असेच प्रकार इचलकरंजी शहरात सुरू असून वाढत्या राजकीय हस्तक्षेपामुळे पोलिसांना कारवाया करण्यात अडचणी येत असून पोलिसांनी राजकीय आश्रय झुगारून कारवाई करण्याची गरज निर्माण झाली आहे
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800





