ICHMH51NEWS.IN
9921600800

पाणीपुरवठ्यावरून महापालिकेची विशेष सभा वादळी ठरणार दिवसाआड पाणी देण्याचे आश्वासन हवेत; नागरिकांत तीव्र संताप

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

पाणीपुरवठ्यावरून महापालिकेची विशेष सभा वादळी ठरणार

दिवसाआड पाणी देण्याचे आश्वासन हवेत; नागरिकांत तीव्र संताप

इचलकरंजी
इचलकरंजीतील ज्वलंत पाणी प्रश्नावरून महानगरपालिकेची विशेष सभा आज मंगळवारी (दि. १२) होत असून या सभेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी होण्याची शक्यता आहे. शहरातील विस्कळीत पाणीपुरवठा, सुळकुड पाणी योजना, काळा ओढा व पंचगंगा नदी प्रदूषण या मुद्यांवरून प्रशासन आणि पदाधिकाऱ्यांना धारेवर धरले जाणार आहे.
इचलकरंजी महानगरपालिकेच्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात दुपारी चार वाजता ही विशेष सभा होणार आहे. स्थायी समिती सभापती सतिश मुळीक, विरोधी पक्षनेते उदयसिंग पाटील यांच्यासह सदस्यांनी ही सभा बोलावण्याची मागणी केली होती.
शहरातील पाणीटंचाई दिवसेंदिवस गंभीर बनत असताना विरोधी पक्षनेते यांनी प्रत्यक्ष पाहणी करून प्रशासनाला जाब विचारला होता. त्यानंतर महापौर व उपमहापौर यांनीही पाणीपुरवठा योजनेची पाहणी करत दिवसाआड पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र तब्बल २० दिवस उलटूनही शहरवासीयांना अद्याप चार ते पाच दिवसाआडच पाणी मिळत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे.
सुळकुड पाणी योजनेचा प्रश्न अद्याप रखडलेला असून काळा ओढा आणि पंचगंगा नदी प्रदूषणामुळे भविष्यातील पाणीपुरवठ्यावर गंभीर परिणाम होण्याची भीती व्यक्त होत आहे. वाढती संभाव्य पाणीटंचाई, अपुरा दाब आणि विस्कळीत वितरण यामुळे प्रशासनाच्या नियोजनावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
सभेत विरोधकांकडून प्रशासनासह सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडण्याची रणनीती आखण्यात आली असून महापौर व उपमहापौरांच्या आश्वासनांवरूनही सत्ताधाऱ्यांना घेरले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे ही विशेष सभा चांगलीच वादळी ठरणार असल्याची चर्चा महानगरपालिका वर्तुळात सुरू आहे.
ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा