सहकार हृदयातून निर्माण झाला पाहिजे : सुरेश प्रभू
केवळ पायाभूत सुविधा नव्हे, तर प्रत्येक व्यक्तीचा विकास महत्त्वाचा
इचलकरंजी
इचलकरंजी येथील आपटे वाचन मंदिर आयोजित वसंत व्याख्यानमालेचा समारोप माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांच्या अभ्यासपूर्ण व्याख्यानाने झाला. ‘सहकार : काल, आज आणि उद्या’ या विषयावर बोलताना त्यांनी सहकार व्यवस्थेचे महत्त्व अधोरेखित करत, “सहकार हा कायद्यातून नव्हे, तर हृदयातून निर्माण झाला पाहिजे,” असे प्रतिपादन केले. यावेळी माजी मंत्री प्रकाश आवाडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
व्याख्यानाच्या सुरुवातीलाच प्रभू यांनी, “मला माजी मंत्री किंवा राजकीय व्यक्ती म्हणून नव्हे, तर एक व्याख्याता म्हणून निमंत्रित केल्याचा अभिमान वाटतो. मंत्री असण्यापेक्षा अभ्यासक व्याख्याता म्हणून ओळखले जाणे मला अधिक महत्त्वाचे वाटते,” असे सांगत उपस्थितांची दाद मिळवली.
देशाच्या अर्थव्यवस्थेवर भाष्य करताना त्यांनी सांगितले की, सरकार रस्ते, रेल्वे आणि विमान व्यवस्था उभी करते म्हणूनच खरा विकास झाला असे होत नाही. प्रत्येक भारतीय व्यक्तीच्या व्यक्तिगत विकासाला चालना देणे हेच सरकारचे खरे कर्तव्य आहे. सरकारी सार्वजनिक उद्योगांना मर्यादा येतात, तर खासगी उद्योगपतींचा विकास सर्वसामान्यांपर्यंत पोहोचत नाही. अशा परिस्थितीत सहकार हीच व्यवस्था सामान्य माणसाच्या विकासासाठी प्रभावी माध्यम ठरू शकते, असे त्यांनी स्पष्ट केले.
शेती आणि उत्पादन क्षेत्राचे उदाहरण देताना प्रभू म्हणाले, “एखादा शेतकरी वैयक्तिक पातळीवर काम करतो तेव्हा तो केवळ उत्पादक आणि विक्रेता राहतो. मात्र सहकाराच्या माध्यमातून तो लाभांशधारक बनतो आणि नफ्यातील वाटाही मिळवतो.”
भारताची अर्थव्यवस्था जगात चौथ्या क्रमांकावर असली तरी दरडोई उत्पन्नाच्या बाबतीत देश १०० व्या क्रमांकाच्याही मागे असल्याचे त्यांनी नमूद केले. “दरडोई उत्पन्नाच्या आकडेवारीवर काही मोजक्या उद्योगपतींच्या अफाट संपत्तीचा प्रभाव असतो. त्यामुळे ती आकडेवारी सामान्य नागरिकांच्या प्रत्यक्ष आर्थिक स्थितीशी जुळत नाही,” असेही त्यांनी स्पष्ट केले.
भांडवलशाही आणि साम्यवादी या दोन्ही व्यवस्थांवरील जागतिक प्रश्नचिन्हांचा उल्लेख करत त्यांनी मिश्र अर्थव्यवस्थेच्याही मर्यादा अधोरेखित केल्या. भविष्यात देशाच्या विकासासाठी सहकार हाच सर्वात सक्षम पर्याय ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
स्वातंत्र्यानंतर लोकसहभागातून सहकार चळवळ उभी राहिली; मात्र काळानुसार वाढलेल्या व्यापामुळे शासनाला कायदे करावे लागले आणि हेच काही कायदे आता सहकारासाठी अडथळा ठरत असल्याचे त्यांनी सांगितले. केंद्रीय सहकार मंत्रालयाच्या धोरणासाठी कार्यरत समिती आपल्या अध्यक्षतेखाली काम करत असून, भूतकाळातील सहकाराचा अभ्यास करून आजच्या त्रुटी दूर करत भविष्यातील सक्षम सहकार उभारण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचेही त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी संस्थेचे माजी अध्यक्ष ॲड. स्वानंद कुलकर्णी यांनी प्रभू यांचा परिचय करून दिला. उपाध्यक्ष काशिनाथ जगदाळे यांनी त्यांचे स्वागत केले. तसेच व्याख्यानमालेच्या प्रायोजकांचा सत्कारही प्रभू यांच्या हस्ते करण्यात आला.
मनोगत व्यक्त करताना माजी मंत्री सुरेश प्रभू
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800








