बाजीराव कांबळे यांच्या परस्परविरोधी वक्तव्यांवर कारवाई; शहराच्या नियमित पाणीपुरवठ्यासाठी विठ्ठल चोपडे यांच्याकडे नियोजन: महापौर उदय धातूंडे
इचलकरंजी :
शहरातील पाणीपुरवठा प्रश्नावरून महानगरपालिकेच्या सभागृहात आणि फिल्टर हाऊस येथे करण्यात आलेल्या वक्तव्यांबाबत वाद निर्माण झाला असून, पाणीपुरवठा विभागाचे अभियंता बाजीराव कांबळे यांनी परस्परविरोधी विधाने करून गोंधळ निर्माण केल्याचा आरोप सत्ताधाऱ्यांकडून करण्यात आला आहे. याप्रकरणी कारवाई करण्याचा इशारा महापौर उदय धातूंडे यांनी दिला.
सत्ताधारी महापौर,उपमहापौर,गटनेते नगरसेवक यांनी फिल्टर हाऊस वर पाहणी केल्यानंतर
महापौर उदय धातूंडे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, विरोधकांनी वस्तुस्थिती जाणून घेऊनच आरोप करावेत. अपुरी अथवा चुकीची माहिती देऊन सभागृहाचा वेळ वाया घालवू नये. नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांवर चर्चा होणे अपेक्षित असताना चुकीच्या आरोपांमुळे विकासकामांवर परिणाम होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
शहरातील नागरिकांना वेळेत व नियमित पाणी मिळावे यासाठी पाणीपुरवठ्याचे संपूर्ण नियोजन गटनेते विठ्ठल चोपडे यांच्याकडे देण्यात आले असल्याचेही त्यांनी सांगितले. विरोधकांनीदेखील राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर विश्वास व्यक्त करत सभागृहात त्यांच्याकडे शहराचा पाणीप्रश्न सोडविण्याची मागणी केल्याचे त्यांनी नमूद केले.
यावेळी जलअभियंता अभय शिरोलीकर यांनी शहरातील पाणीपुरवठा यंत्रणेची सद्यस्थिती स्पष्ट केली. त्यांनी सांगितले की, एकूण २२ पंपांपैकी सध्या १७ पंप कार्यरत आहेत. तीन पंप स्क्रॅप करण्यात आले असून दोन पंप नादुरुस्त अवस्थेत आहेत.
यावर गटनेते विठ्ठल चोपडे यांनी सांगितले की, सध्या सुरू असलेल्या १७ पंपांपैकी १० पंपांवरून पाणीपुरवठा सुरळीत सुरू आहे. यंत्रणेमध्ये सुधारणा करून येथून पुढे शहराला नियमित व वेळेत पाणीपुरवठा करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. नागरिकांना पाण्याच्या समस्येला सामोरे जावे लागू नये यासाठी प्रशासन आणि सत्ताधारी एकत्रितपणे काम करत असल्याचे त्यांनी सांगितले.
या वेळी महापौर उदय धातूंडे, उपमहापौर अनिल डाळ्या,गटनेते विठ्ठल चोपडे,नगरसेवक रूबेन आवळे, स्थायी समिती सभापती सतीश मुळीक तसेच नगरसेवक रवी रजपूते, अभिषेक वाळवेकर आणि सुशांत कलागते उपस्थित होते.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800





