ICHMH51NEWS.IN
9921600800

महाराष्ट्राचा शाहिरी बाणा कार्यक्रमाने शंभूतीर्थ परिसर शिवमय; संभाजी महाराज जयंती उत्साहात साजरी

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

महाराष्ट्राचा शाहिरी बाणा कार्यक्रमाने शंभूतीर्थ परिसर शिवमय; संभाजी महाराज जयंती उत्साहात साजरी

इचलकरंजी :
धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त श्री शंभूतीर्थ परिसरात बुधवारी सायंकाळी रंगलेल्या ‘महाराष्ट्राचा शाहिरी बाणा’ या शाहिरी कार्यक्रमाने उपस्थित शिवप्रेमींमध्ये प्रचंड उत्साह निर्माण केला. प्रसिद्ध शाहिर चंद्रकांत माने आणि शाहीर ऋतुजा माने यांच्या दमदार सादरीकरणाने संपूर्ण परिसर शिवमय झाला होता.
धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज स्मारक समितीच्यावतीने आयोजित या कार्यक्रमास नागरिक, शिवभक्त आणि युवकांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली. श्री शंभूतीर्थ उभारणीनंतर प्रथमच संभाजी महाराजांची जयंती इतक्या मोठ्या उत्साहात साजरी होत असल्याने कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले.
शाहिर चंद्रकांत माने आणि शाहीर ऋतुजा माने यांनी सादर केलेल्या पोवाड्यांनी उपस्थितांमध्ये स्फूर्ती निर्माण केली. छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्या शौर्यगाथा, स्वराज्याची परंपरा आणि हिंदवी स्वराज्यासाठी दिलेल्या बलिदानाचे प्रभावी वर्णन शाहिरी शैलीत करण्यात आले. ‘स्वराज्याचं तोरण बांधलं… शिवबा राजं…’ या गीताला उपस्थितांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत टाळ्यांच्या गजरात दाद दिली.
कार्यक्रमाची सुरुवात प्रेरणा मंत्राने झाली. संपूर्ण वातावरण ढोल-ताशांच्या गजरात आणि जयघोषांनी भारावून गेले होते. शाहिरी सादरीकरणातील जोश, शब्दांतील धार आणि इतिहासाची जिवंत मांडणी यामुळे कार्यक्रमाला विशेष रंगत प्राप्त झाली.
प्रारंभी ॲड. समीर मुदगल यांनी स्वागत केले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. मंगेश मस्कर यांनी आभार मानले. कार्यक्रमाची सांगता ध्येयमंत्राने करण्यात आली.
जयंतीनिमित्त ९ मे रोजी श्री शिवछत्रपती आणि संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित स्पर्धा परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. इयत्ता चौथी ते नववी आणि दहावी ते बारावी अशा दोन गटांत ही परीक्षा घेण्यात आली. विजेत्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे प्रदान करण्यात आली.
यावेळी आमदार राहुल आवाडे, महापौर उदय धातुंडे, उपमहापौर अनिल डाळ्या, स्थायी समिती सभापती सतीश मुळीक, अतिरिक्त आयुक्त सुषमा शिंदे, शिवसेना जिल्हाप्रमुख रवींद्र माने, जवाहर छाबडा, गजानन महाजन गुरुजी, विरोधी पक्षनेते उदयसिंग पाटील, नगरसेवक राजू बोंद्रे, कार्यवाह प्रसाद जाधव यांच्यासह मान्यवर, धारकरी, शिवशंभू भक्त व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शस्त्र प्रदर्शन नागरिकांसाठी खुले
दरम्यान, गुरुवारी सकाळी ६ वाजता श्री शंभूतीर्थ येथे अभिषेक व मानवंदना कार्यक्रम उत्साहात आणि भक्तिभावात पार पडला. त्यानंतर ऐतिहासिक व शिवकालीन शस्त्र प्रदर्शनाचे उद्घाटन आमदार राहुल आवाडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी स्थायी समिती सभापती सतीश मुळीक, गजानन महाजन गुरुजी, नगरसेविका मनिषा नवनाळे व धारकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शुक्रवारी सकाळी ९ ते रात्री १० वाजेपर्यंत लक्ष्मी मार्केट परिसरात हे प्रदर्शन नागरिकांसाठी खुले राहणार आहे.

शाहिरी बाणा कार्यक्रम सादर करताना कलाकार
ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा