ऑनलाइन नोंदणी आवश्यकच; अडचणी दूर करून फॉर्ममध्ये बदल करू : मंत्री संजय सावकारे
मुंबई :
राज्यातील यंत्रमागधारकांना वीजदर सवलतीसाठी ऑनलाइन नोंदणी रद्द करण्याच्या मागणीवर मंत्रालयात वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे आणि शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्यासोबत सविस्तर चर्चा झाली. यावेळी मंत्र्यांनी ऑनलाइन नोंदणी आवश्यक असल्याचे स्पष्ट करत, यंत्रमागधारकांच्या अडचणी दूर करण्यासाठी फॉर्ममध्ये आवश्यक सुधारणा करण्यात येतील, असे आश्वासन दिले.
यंत्रमागधारक जागृती संघटनेचे अध्यक्ष विनय महाजन यांनी ऑनलाइन प्रक्रियेमुळे वाढणाऱ्या ‘एजंटगिरी’चा मुद्दा उपस्थित करत सक्तीच्या अटींवर पुनर्विचार करण्याची मागणी केली. नोंदणी न केल्यास वीज बिलावरील अनुदान बंद करण्याचा कोणताही निर्णय घेऊ नये, अशी मागणीही त्यांनी केली. महाराष्ट्र राज्य पॉवरलूम फेडरेशनचे अध्यक्ष पुंडलिक जाधव यांनी राज्यातील सर्व वस्त्रोद्योग केंद्रांतील यंत्रमागधारक प्रतिनिधी आणि लोकप्रतिनिधींशी चर्चा करूनच धोरणात्मक निर्णय घ्यावेत, असे मत व्यक्त केले. वस्त्रोद्योग महासंघाचे अध्यक्ष अशोक स्वामी यांनी ऑफलाइन नोंदणीचा पर्याय सुचविला.
यावर मंत्री संजय सावकारे यांनी नोंदणी प्रक्रिया रद्द करणे शक्य नसल्याचे स्पष्ट केले. मात्र, नोंदणी प्रक्रियेत येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन फॉर्ममध्ये आवश्यक बदल केले जातील, असे सांगितले. तसेच इचलकरंजी, मालेगाव, भिवंडी, सोलापूर, विटा आदी वस्त्रोद्योग क्षेत्रांमध्ये मेळावे घेऊन विभागीय अधिकाऱ्यांकडून थेट मार्गदर्शन केले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
बैठकीस यंत्रमागधारक जागृती संघटनेचे अध्यक्ष विनय महाजन, शिवसेना प्रणित यंत्रमागधारक संघटनेचे राज्याध्यक्ष नंदकुमार लोखंडे, कोल्हापूर जिल्हा पॉवरलूम असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष विश्वनाथ मेटे, कार्याध्यक्ष शहाजी भोसले, वस्त्रोद्योग महासंघाचे अध्यक्ष अशोक स्वामी तसेच भिवंडी, मालेगाव आणि विविध वस्त्रोद्योग क्षेत्रांतील यंत्रमागधारक प्रतिनिधी उपस्थित होते.
मंत्री संजय सावकारे यांना निवेदन देताना विनय महाजन,पुंडलिक जाधव,अशोक स्वामी,शहाजी भोसले, नंदकुमार लोखंडे व इतर
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800




