दिवाळी पहाटनिमित्त इचलकरंजीत ‘सुनहरे गीत’ हा हिंदी मराठी गीतांचा कार्यक्रम
इचलकरंजी:
प्रतिवर्षीप्रमाणे येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘दिवाळी पहाट’ या उपक्रमाच्या अंतर्गत हिंदी व मराठी चित्रपटांमधील श्रवणीय आणि अविस्मरणीय ठरलेल्या लोकप्रिय गीतांचा ‘सुनहरे गीत’ हा सुरेल कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. येथील मनोरंजन मंडळ, श्री दगडूलाल मर्दा फौंडेशन, रोटरी क्लब सेंट्रल, रोटरी क्लब टेक्स्टाईल सिटी, रोटरी क्लब एक्झीक्युटिव्ह, नारायणदास दामोदर भंडारी फौंडेशन आणि संघवी माणकचंद वरधीचंद ललवाणी चॅरिटेबल ट्रस्ट यांच्यातर्फे हा कार्यक्रम होणार आहे.
या कार्यक्रमात चित्रपट संगीताच्या सुवर्ण युगातील लता, रफी, किशोर, आशा यांची गाजलेली गीते सादर करण्यात येणार आहेत. कार्यक्रमाची संकल्पना व निर्मिती कलावती आर्ट, पुणे यांची असून यामध्ये धवल चांदवडकर, रसिका गानू, रमा कुलकर्णी आणि प्रशांत नासेरी हे सुप्रसिद्ध गायक कलाकार आहेत. त्यांच्यासोबत नीरजा आपटे या निवेदनाची बाजू सांभाळणार आहेत.
Advt
या कार्यक्रमाचे संगीत संयोजक व की बोर्ड वादक अनय गाडगीळ हे आहेत. त्याचबरोबर देवेन वैजापूरकर (तबला), आदित्य गोगटे (बासरी), अभय इंगळे (ऑक्टोपॅड व तालवाद्य) आणि मंदार गोडसे (सिंथेसायजर) हे वादक कलावंत साथसंगत करणार आहेत. हा कार्यक्रम शनिवार दिनांक १८ ऑक्टोबर २०२५ रोजी पहाटे ठीक ६ वाजता येथील श्रीमंत घोरपडे नाट्यगृहात होणार आहे. कार्यक्रमासाठी रसिक नागरीकांना प्रवेश खुला असून रसिकांनी पारंपरिक वेशभूषेत यावे असे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







