ICHMH51NEWS.IN
9921600800

इचलकरंजी महापालिकेत महाविकास आघाडीचाच महापौर होणार,भाजपच्या गाडीत मित्रपक्षाचेच नेते

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

इचलकरंजी महापालिकेत महाविकास आघाडीचाच महापौर होणार,भाजपच्या गाडीत मित्रपक्षाचे नेते

इचलकरंजी:
“इचलकरंजी महापालिकेच्या पहिल्या निवडणुकीत महापौर महाविकास आघाडीचाच होईल,” असा ठाम दावा महाविकास आघाडीचे नेते शशांक बावचकर, मदन कारंडे व सागर चाळके यांनी पत्रकार परिषदेत केला. यावेळी त्यांनी भाजपवर टीकास्त्र सोडत आगामी निवडणुकीसाठी महाविकास आघाडीची रणनीती स्पष्ट केली.
Advt

 भाजप प्रवेशामुळे फरक नाही — बावचकर

नुकत्याच झालेल्या भाजप प्रवेशाबाबत प्रतिक्रिया देताना बावचकर म्हणाले, “भाजप प्रवेशामुळे महाविकास आघाडीला कोणताही फटका बसणार नाही. भाजपने सवयीप्रमाणे मित्रपक्षाचेच नेते आपल्या तंबूत घेतले आहेत. उदयसिंग पाटील यांच्यामुळे निवडून आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका नगरसेविकेशिवाय इतर कोणतेही नुकसान झालेले नाही.”

त्यांनी पुढे सांगितले, “भाजपचे आमदार राहुल आवाडे यांना टक्केवारी व स्टंटबाजी यामध्येच रस असून शहरातील जनतेत त्यांच्याबद्दल मोठी नाराजी आहे. लोकसभा व विधानसभा निवडणुकांनंतर शहरासाठी आमदार-खासदारांनी काहीच केलेले नाही. मतदार याचा वचपा मतपेटीतून काढतील.”

 ‘भ्रमाचा भोपळा फुटणार’ — मदन कारंडे

मदन कारंडे यांनी सांगितले, “शहरातील पाणीप्रश्न आजही सुटलेला नाही. चार विधानसभा आमदारकी झाल्या तरी हा प्रश्न कायम आहे. सत्ता असताना पाणी योजना का राबवली नाही? हाळवणकर यांनी मंजूर करून आणलेली वारणा योजना प्रकाश आवाडे यांनी मोडकळीस काढली.”

त्यांनी स्पष्ट केले की, “आमच्याकडे मेरिटवर लढणारे उमेदवार आहेत आणि आम्ही निवडणुकीसाठी जोरदार तयारी केली आहे. भाजपचा भ्रमाचा भोपळा नागरिक स्वतः फोडतील.”

 पाणी व वीज प्रश्नी आमदारांचे अपयश— सागर चाळके

सागर चाळके म्हणाले, “आमदार आवाडे शहरातील पाणी व वीज प्रश्न सोडवण्यात पूर्णपणे अपयशी ठरले आहेत. दोन वर्षांपूर्वी रोज पाणी देतो अशी घोषणा मतदारांना फसवण्यासाठी केली. आता पुन्हा निवडणुकीच्या तोंडावर बोरिंग पाण्यावर लोकांची दिशाभूल करत आहेत.”

ते पुढे म्हणाले, “भूजल पातळीचा विचार न करता मनमानी पद्धतीने बोरिंग मारली जात आहे.बोरिंगचे पाणी पिण्यायोग्य नसल्याबाबत यापूर्वी पालिका सूचना लिहीत होती आता याकडे महानगरपालिकेचे आयुक्त दुर्लक्ष करत आहेत. आम्ही याची वरिष्ठ स्तरावर तक्रार करणार आहोत.”

 निवडणूक तयारीसाठी समिती गठीत

निवडणुकीसाठी उमेदवार निवड समितीत उदयसिंग पाटील, संजय कांबळे आणि प्रकाश मोरबाळे यांची नेमणूक करण्यात आली आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) तर्फे मलकारी लवटे यांनी सांगितले की, “महाविकास आघाडी भक्कम असून पक्षप्रमुखांकडून येणाऱ्या आदेशानुसार पुढील रणनीती आखली जाईल.”

महापालिका निवडणुकीत महाविकास आघाडीचे मुद्दे

शहरातील पाणीप्रश्न सोडवणे,टी. पी. स्कीमचे नूतनीकरण,विकास योजनेतील अनावश्यक आरक्षण बदल थांबवणे,नागरिकांना जास्तीत जास्त सवलती मिळवून देणे,महापालिका शाळांचा दर्जा सुधारणे व विद्यार्थी गळती रोखणे,‘क (१) शेरा’ व शास्ती प्रश्न निकालात काढणे,महसुली खात्यातील प्रलंबित कामांचा जलद निपटारा असे मुद्दे जाहीर करण्यात आले.

पाणीप्रश्नी आमदारांनी मोर्चा काढावा— सागर चाळके

“कार्यसम्राट आमदारांच्या वाढदिवसाच्या गर्दीप्रमाणेच गर्दी करून सुळकुड प्रश्नावरही मोर्चा काढावा. आम्ही त्यात सहभागी होऊ,” असे आवाहन चाळके यांनी केले.

 पत्रकार परिषदेत उदयसिंग पाटील,रणजित जाधव,सदा मलाबादे,अमरजीत जाधव,बाबासो कोतवाल,प्रमोद खुडे,बाबू पनोरी,रावसो निर्मळे,सयाजी चव्हाण,अभिषेक सारडा, प्रकाश सुतार,वसंत कोरवी आदि मान्यवर उपस्थित होते.

पत्रकार परिषदेत मदन कारंडे,सागर चाळके,शशांक बावचकर, उदयसिंग पाटील,अमरजीत जाधव

ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा