ICHMH51NEWS.IN
9921600800

दिवाळी पहाट ‘सुनहरे गीत’ कार्यक्रमास रसिकांचा प्रचंड प्रतिसाद 

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

दिवाळी पहाट ‘सुनहरे गीत’ कार्यक्रमास रसिकांचा प्रचंड प्रतिसाद 

इचलकरंजी:
चित्रपट संगीताच्या सुवर्ण युगातील… लता मंगेशकर, मोहम्मद रफी, किशोर कुमार, आणि आशा भोसले या दिग्गज व श्रेष्ठ कलावंतांच्या लोकप्रिय गीतांचा ‘सुनहरे गीत’ हा रंगतदार कार्यक्रम प्रेक्षकांच्या प्रचंड प्रतिसादात येथे संपन्न झाला. कलावती आर्ट, पुणे प्रस्तुत या कार्यक्रमातील सुरुवातीच्या मुसाफिर हूं यारो पासून शेवटच्या अभी ना जाओ छोड कर या गीतापर्यंत तब्बल तीन तास या कार्यक्रमाने रसिकांना निखळ आनंद दिला. धवल चांदवडकर, रसिका गानू, रमा कुलकर्णी आणि प्रशांत नासेरी या सुप्रसिद्ध गायक कलाकारांचे उत्कृष्ट सादरीकरण त्याचबरोबर नीरजा आपटे यांचे उत्तम निवेदन आणि सर्वच वादक कलाकारांची दर्जेदार अशी साथसंगत यामुळे सर्वच कार्यक्रम दर्जेदार झाला. येथील श्रीमंत घोरपडे नाट्यगृहात सोळाशेहून अधिक श्रोत्यांनी या कार्यक्रमाचा आस्वाद घेतला.
Advt
कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रमुख पाहुणे, इचलकरंजी महानगरपालिकेच्या आयुक्त व प्रशासक सौ. पल्लवी पाटील आणि रोटरी प्रांत ३१७०चे प्रांतपाल इंजि. अरुण भंडारे तसेच राजेश काजवे, अतुल शहा, ए. आर. तांबे आणि सहाय्यक प्रांतपाल गिरीश कुलकर्णी यांच्या हस्ते दीप प्रज्वलन आणि नटराज प्रतिमा पूजन करण्यात आले. याप्रसंगी सर्व संयोजक संस्थांचे प्रतिनिधी समीर गोवंडे, घनशाम सावलानी, प्रकाश लाहोटी, संतोष साधले, भरत भंडारी अरुण ललवाणी आणि राजेंद्र सोलापूरे हे व्यासपीठावर उपस्थित होते. येथील मनोरंजन मंडळ, श्री दगडूलाल मर्दा फौंडेशन, रोटरी क्लब सेंट्रल, रोटरी क्लब टेक्स्टाईल सिटी, रोटरी क्लब एक्झिक्युटिव्ह, नारायणदास दामोदर भंडारी फौंडेशन आणि संघवी मानकचंद वरधीचंद ललवाणी चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने दिवाळी पहाट उपक्रमाच्या अंतर्गत हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
“इचलकरंजी सारख्या उद्योग नगरीत सतत सोळा वर्षे अशा प्रकारचा सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केला जातो आणि सकाळी लवकर रसिक नागरीकांचा इतका मोठा प्रतिसाद लाभतो हे कौतुकास्पद आहे.” अशा आशयाचे उदगार पल्लवी पाटील यांनी काढले. याचबरोबर याप्रसंगी प्रांतपाल भंडारे यांनीही शुभेच्छापर मनोगत व्यक्त केले. त्यापूर्वी उपक्रम समन्वयक ॲड. शिवकुमार धड्ड यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. यावेळी कार्यक्रमास सहकार्य करणाऱ्या सर्वांना गुलाब पुष्प व भेटवस्तू प्रदान करण्यात आली.
कार्यक्रमाच्या पूर्वार्धात मुसाफिर हूं यारो, केव्हा तरी पहाटे, एहसान तेरा, गाता रहे मेरा दिल, अच्छा जी मै हारी चलो, ये जो मोहब्बत है, श्रावणात घननिळा बरसला, अजहू न आये बालमा, तेरे बिना जिंदगी से, मधुबन मे राधिका… अशी एकाहून एक श्रवणीय सोलो गाणी तसेच द्वंद्व गीते सादर करण्यात आली. कार्यक्रमाच्या उत्तरार्धात मेरे सपनों की रानी,  जिंदगी इक सफर, गुलाबी आँखे, लग जा गले, प्रभू तू दयाळू, अजीब दास्तां, सलोना सजन, एक चतुर नार, नैन लड गई रे, रेशमाच्या रेघानी आणि अभी ना जाओ अशी वैविध्यपूर्ण गाणी सादर करण्यात आली. सर्वच कलाकारांचे गीत सादरीकरण दर्जेदार व शैलीदार झाल्यामुळे रसिकांनी भरभरून प्रतिसाद दिला आणि अनेक गीतांना वन्स मोअरची दादही दिली.
या कार्यक्रमाचे संगीत संयोजन अनय गाडगीळ यांचे होते. त्यांच्यासोबत तबल्यावर देवेन वैजापूरकर, बासरीसाठी आदित्य गोगटे, ऑक्टोपॅड व तालवाद्यासाठी अभय इंगळे आणि सिंथेसायझरवर मंदार गोडसे यांनी अतिशय उत्तम अशी साथसंगत केली. कार्यक्रमाची उत्तम अशी ध्वनी व्यवस्था आणि प्रकाश योजना होगाडे जॉबर यांची होती. दिवाळी पहाट निमित्त सकाळी लवकर झालेल्या या मैफलीसाठी इचलकरंजी व परिसरातील रसिक श्रोते मोठ्या संख्येने उपस्थित होते. पारंपारिक वेशातील रसिक वर्ग तसेच युवा वर्गाच्या उपस्थितीमुळे कार्यक्रम अधिकच दिमाखदार ठरला. प्रवेशद्वारापासून आकर्षक कमान व केळीची सजावट, स्वागत कक्षात स्त्रियांसाठी गजरे आणि सर्वांसाठी पेढे तसेच व्यासपीठावर रंगीत आकाश कंदील व झेंडूच्या माळा यामुळे प्रसन्न अशी वातावरण निर्मिती झाली. कार्यक्रमाचे सूत्र संचालन संतोष आबाळे यांनी केले तर समीर गोवंडे यांनी आभार व्यक्त केले. धन त्रयोदशीच्या दिवशी सादर झालेल्या सुरेल सोनेरी गीतांनी रसिकांना आठवणीत राहणार अनुभव निश्चितपणे दिला.
कार्यक्रम सादर करत असताना कलाकार
ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा