फटाक्याच्या वादातून कोयत्याने जीवघेणा हल्ला — कोरोचीतील व्यापारी गंभीर जखमी
शहापूर:
कोरोची (ता. हातकणंगले) येथे फटाके वाजवण्याच्या किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून सहा अनोळखी इसमांनी व्यापाऱ्यावर कोयत्याने जीवघेणा हल्ला केला.मंगळवारी रात्री साडेसातच्या सुमारास घडलेल्या प्रकरणी शहापूर पोलीस ठाण्यात सहा अनोळखी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Advt
फिर्यादी माणिक सदाशिव भंडारे (वय ५०, व्यवसाय – व्यापार, रा. चिंतामणी गल्ली नं. 0८,कोरोची) हे दिवाळी सणानिमित्त आपल्या घरासमोर कुटुंबियांसह फटाके वाजवत होते. त्या वेळी मोटारसायकलवरून गेलेल्या तीन अनोळखी इसमांमध्ये त्यांच्या मुलगा रतन व पत्नी मनिषा यांच्याशी किरकोळ वाद झाला होता. त्या घटनेचा राग मनात धरून मंगळवारी रात्री सहा आरोपी मोटारसायकलवरून येत घरासमोर आले.जिल्हाधिकारी, कोल्हापूर यांच्या बंदी आदेशाचे उल्लंघन करून आरोपींनी कोयत्यासारखी घातक हत्यारे हातात घेतली. त्यानंतर आरोपींनी भंडारे यांना शिवीगाळ करत “हा आज सोडायचा नाही” असे म्हणत ठार मारण्याच्या उद्देशाने हल्ला केला. त्यापैकी केशरी रंगाचा शर्ट, ह्युडी व हाफ चड्डी तसेच पँट-शर्ट घातलेल्या आरोपींनी कोयत्याने चार वेळा भंडारे यांच्या डोक्यावर वार करून त्यांना गंभीर जखमी केले. इतर आरोपींनी त्यांच्या पत्नी व मुलावर दगडफेक करून शिवीगाळ केली.
हल्ल्यानंतर आरोपींनी त्यांच्याच मोटारसायकलपैकी एक (क्रमांक MH-09-FS-0667) घटनास्थळी टाकून पळ काढला. जखमी भंडारे यांना तातडीने इंदिरा गांधी सामान्य रुग्णालय, इचलकरंजी येथे दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
या प्रकरणी पो.ना. वडगावे यांनी फिर्याद नोंदवली असून पुढील तपास महिला पोसई साबळे करत आहेत.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







