ICHMH51NEWS.IN
9921600800

अंगणवाडीसेविकेचा मुलगा बनला क्लासवन अधिकारी, इचलकरंजीच्या तन्मय मांडरेकर याचं लख्ख यश…! इचलकरंजीतील तन्मय मांडरेकर यांनी नुकत्याच जाहीर झालेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या राज्यसेवा परीक्षेत ओबीसी प्रवर्गातून राज्यात अव्वल येत लख्ख यश मिळवलय.

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

अंगणवाडीसेविकेचा मुलगा बनला क्लासवन अधिकारी, इचलकरंजीच्या तन्मय मांडरेकर याचं लख्ख यश…!

इचलकरंजीतील तन्मय मांडरेकर यांनी नुकत्याच जाहीर झालेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या राज्यसेवा परीक्षेत ओबीसी प्रवर्गातून राज्यात अव्वल येत लख्ख यश मिळवलय.

इचलकरंजी:
घरची हलाखीची परिस्थिती, वयाच्या चौथ्या वर्षी पितृछत्र हरपलं, आई, आजी आणि कुटुंबीयांनी शिक्षणाला प्रोत्साहन देत हवं ते करण्याची दिलेली मुभा. या संधीचं सोनं करत इचलकरंजीतील तन्मय मांडरेकर यांनी नुकत्याच जाहीर झालेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या राज्यसेवा परीक्षेत ओबीसी प्रवर्गातून राज्यात अव्वल येत लख्ख यश मिळवलंय. दहा बाय दहाच्या खोलीत ‘अभ्यास एके अभ्यास’ हाच मंत्र घेऊन चिन्मय यांनी कोणत्याही खासगी क्लासशिवाय क्लासवन पदाला गवसणी घातली आहे. जन्मदात्या आईनं सोसलेले कष्ट आणि त्यांनी पाहिलेलं स्वप्न पूर्ण केल्याचं समाधान असल्याची प्रतिक्रिया तन्मय मांढरेकर यांनी व्यक्त केली.
तर यश खेचून आणता येतं : वस्त्रनगरी असलेल्या इचलकरंजीतील बोने माळ इथं तन्मय मांडरेकर कुटुंबीयांसोबत राहतात. तन्मय यांच्या वयाच्या चौथ्या वर्षी वडील अनिल मांडरेकर यांचं निधन झालं. घरावर दुःखाचा डोंगर असताना आई राधिका यांनी तन्मय यांची आजी हौसाबाई यांच्या मदतीनं घराला सावरलं. घरचा कमवता माणूसच निघून गेल्यामुळं आर्थिक अडचणींना सामोरं जावं लागत होतं. मात्र आई राधिका यांनी अंगणवाडीसेविका म्हणून कामाला सुरुवात केली आणि शकणाऱ्या दोन मुलांना प्रोत्साहन देण्याचं काम केलं. दहावीपर्यंत तन्मय प्रत्येक वर्गात पहिला येत होता. दहावीला सुद्धा 98 टक्के गुण मिळवून विभागात अव्वल क्रमांक मिळवला.
Advt
‘मुलाचे पाय पाळण्यात दिसतात’ या उक्तीप्रमाणं आईला आपला मुलगा काहीतरी करून दाखवेल असं वाटत होतं. बारावीच्या परीक्षेतही चांगल्या मार्कांनी तन्मय उत्तीर्ण झाला. यानंतर पुण्यातील सीओईपी महाविद्यालयातून सिव्हील इंजिनिअरिंगची पदवी संपादन करत 2022 मध्ये स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासाला तन्मय यांनी सुरुवात केली. याआधी पूर्वतयारी म्हणून वेगवेगळ्या वृत्तपत्रांचा बारकाईनं अभ्यास त्यांनी केला होता. जिद्द, चिकाटी आणि सातत्याच्या बळावर राज्यसेवेच्या पहिल्याच प्रयत्नात 2023 मध्ये झालेल्या राज्यसेवा परीक्षेत गटविकास अधिकारी पदाला गवसणी घातली. तर गतवर्षी झालेल्या राज्यसेवेच्या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. या परीक्षेत ओबीसी प्रवर्गातून राज्यात प्रथम येण्याचा बहुमान तन्मय मांढरेकर यांनी मिळवला आहे. “अपयश आल्यानंतर खचून न जाता सातत्यानं प्रयत्न केल्यास यश खेचून आणता येतं,” अशी भावना तन्मय यांनी व्यक्त केली.
*आईच्या आनंदाला गगन ठेंगणे* : तन्मय अवघ्या चार वर्षाचे असताना वडिलांनी जगाचा निरोप घेतला. मात्र कणखर आईनं मुलगी रेवती आणि तन्मय यांना शिक्षणासाठी काहीही कमी पडू दिलं नाही. “अंगणवाडी सेविकेच्या नोकरीतून मिळणारे मानधन बाजूला ठेवून मुलांसाठी शिक्षणाची तजवीज करताना तारेवरची कसरत व्हायची. मात्र मुलाची शिक्षणासाठी जिद्द बघून काहीही करावं लागलं तरी चालेल. मात्र मुलाला अधिकारी झालेलं पाहायचं होतं.” अशी भावना तन्मयची आई राधिका यांनी व्यक्त केली.
Advt
दहावीच्या सुट्टीत पेन विकायचं केलं काम : “तन्मय यांच्या घरची परिस्थिती फारच हालाखीची होती. घरात आलेला कोणताही कागद मनमोकळेपणानं लक्ष देऊन वाचन करण्याची तन्मयची सवय होती. दहावीची परीक्षा दिल्यानंतर मिळालेल्या वेळात बसस्थानकावर पेन विकण्याचं कामही तन्मयनं केलं होतं. यातून त्यानं कुटुंबाला हातभार लावला. त्यांनी केलेल्या कष्टामुळं आज ते मोठे अधिकारी झालेत,” अशी भावना त्यांचे मामा अभिजीत साळुंखे यांनी व्यक्त केली.
*अधिकारी तन्मय मांडरेकर इचलकरंजीमध्ये होतय कौतुक*  :
सध्या तन्मय मांढरेकर पुण्यातील यशदा इथं गटविकास अधिकारी पदाचं प्रशिक्षण घेत आहेत. त्याची बहीण रेवती माने शाहुवाडी तालुक्यात जिल्हा परिषदेकडं प्राथमिक शिक्षिका म्हणून कार्यरत आहे. प्रतिकूल परिस्थितीवर मात करत तन्मय यांनी मिळवलेल्या या यशाचं वस्त्रनगरी इचलकरंजीत कौतुक होत आहे.
ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा