‘प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजना’ अंतर्गत कर्मचारी नोंदणी मोहिमेचे इचलकरंजीत आयोजन
इचलकरंजी (प्रतिनिधी):
भारत सरकारच्या प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजना अंतर्गत कर्मचारी नोंदणी मोहिम २०२५ या कार्यक्रमाचे चर्चासत्र मंगळवार, दि. ४ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी ११ वाजता इंजिनिअरिंग असोसिएशन, खंजीरे इंडस्ट्रियल इस्टेट, शहापूर, इचलकरंजी येथे आयोजित करण्यात आले आहे.
या कार्यशाळेचे आयोजन भविष्य निर्वाह निधी कार्यालय (EPFO), कोल्हापूर यांच्या वतीने करण्यात आले असून, शहर व परिसरातील सर्व उद्योजकांनी या चर्चासत्रास उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे आवाहन क्षेत्रीय भविष्य निधी आयुक्त श्री. मनीष कुमार हल्दोनी यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.
Advt
नुकतेच भारत सरकारने रोजगार निर्मितीस चालना देण्यासाठी प्रधानमंत्री विकसित भारत योजना मंजूर केली असून, या योजनेचा उद्देश उत्पादन क्षेत्रासह विविध उद्योगांमध्ये रोजगार संधी वाढविणे हा आहे.
एकूण ९९,४४६ कोटी रुपयांच्या या ऐतिहासिक योजनेतून सुमारे ३.५ कोटींहून अधिक रोजगार निर्माण करण्याचा सरकारचा उद्देश आहे.
या योजनेअंतर्गत ईपीएफओमध्ये पहिल्यांदा नोंदणीकृत कर्मचाऱ्यांना दोन हप्त्यांमध्ये एक महिन्याचे वेतन प्रोत्साहन (₹१५,००० पर्यंत) देण्यात येणार आहे. तसेच, नियुक्त नियोक्त्यांना दोन वर्षांच्या कालावधीत प्रत्येक अतिरिक्त कामगारामागे प्रति महिना ₹३,००० पर्यंत प्रोत्साहन देण्यात येणार आहे.
या योजनेविषयी सविस्तर माहिती आणि नोंदणी प्रक्रियेचा परिचय देण्यासाठी ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली असून, उपस्थित उद्योजकांना या योजनेतील लाभ आणि अटींबाबत तज्ज्ञांकडून मार्गदर्शन केले जाणार आहे.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







